Vehicle Theft : चक्कर आल्याने रस्त्याच्या बाजूला डोळे मिटून थांबलेल्या दुचाकीस्वाराची अवघ्या पाच मिनिटात दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – दुचाकीवरुन जात असताना दुचाकीस्वाराला चक्कर आली. त्यामुळे त्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबवून पाच मिनिटे डोळे झाकून घेतले. या पाच मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. ही घटना 30 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दापोडी येथे घडली.

धोंडीराम दगडू देसक (वय 42, रा. गणेशपेठ, पुणे) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धोंडीराम 30 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मेगामार्ट ते सी एम ई कॉलेजच्या गेट दरम्यान दापोडी येथून जात होते. त्यांना अचानक चक्कर येऊ लागल्याने त्यांनी त्यांची दुचाकी (एम एच 12 / टी जी 6809) रस्त्याच्या बाजूला थांबवली. फिर्यादी दुचाकीवरून खाली उतरले आणि रस्त्याच्या बाजूला पाच मिनीटे डोळे मिटून थांबले. या पाच मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

मंगळवारी पिंपरी चिंचवड शहरात तीन वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये भोसरी येथून दोन तर हिंजवडी परिसरातून एक दुचाकी चोरीला गेली आहे. तसेच वाकड परिसरातून एका ईको गाडीचा सायलेन्सर देखील चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.