Pimpri News: भाजपने सहा महिन्यांनी रवी लांडगे यांचा स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारला

रिक्त झालेल्या जागेवर महासभेत नवीन सदस्याची नियुक्ती होणार

एमपीसी न्यूज – स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलताच मार्च महिन्यात तडकाफडकी स्थायी समिती सदस्यत्वाचा रवी लांडगे यांनी दिलेला राजीनामा भाजपने अखेर स्वीकारला. तब्बल सहा महिन्यांनी महापौर उषा ढोरे यांनी रवी यांचा राजीनामा मंजूर केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी 20 सप्टेंबरच्या महासभेत नवीन एका सदस्याची नियुक्ती केली जाणार आहे.

महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत रवी लांडगे हे भोसरीतून बिनविरोध निवडून आले. महापालिका पंचवार्षिकच्या शेवटच्या वर्षी त्यांची स्थायी समिती सदस्यपदी वर्णी लागली. ते अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. त्यांना डावलून अ‍ॅड.नितीन लांडगे यांची स्थायी समिती अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामुळे नाराज झालेल्या रवी लांडगे यांनी तडकाफडकी 2 मार्च 2021 रोजी महापौर उषा ढोरे यांच्याकडे स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा  दिला. महापौरांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता.

महापौरांनी राजीनामा मंजूर केला नसला तरी त्यांनी मार्च पासून स्थायी समितीच्या एकाही बैठकीला हजेरी लावली नाही. तब्बल सहा महिन्यांनी महापौरांनी रवी यांचा स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर केला. त्यांचा राजीनामा मंजूर केल्याने स्थायी समितीमधील भाजपची एक जागा रिक्त झाली. त्यांच्या रिकाम्या जागेवर 20 सप्टेंबरच्या महासभेत नवीन सदस्याची नियुक्ती केली जाणार आहे. शेवटच्या चार महिन्यांसाठी भाजप कोणत्या नगरसेवकाला स्थायी समितीत संधी देते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.