Pune : दोन रुपये भाडेवाढ पीएमपी संचालक मंडळाने लावली फेटाळून

एमपीसी न्यूज – इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने प्रस्तावित केलेली दोन रुपयांची भाडेवाढ संचालक मंडळाने फेटाळून लावली. त्याऐवजी पीएमपी प्रशासनाने उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधण्याचा सल्ला मंडळाच्या बैठकीत देण्यात आला. तसेच पुढील वर्षभरात 150 ई-बससह 840 सीएनजी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. 

‘पीएमपी’च्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी झाली. या बैठकीमध्ये भाडेवाढ, बसखरेदीसह विविध मुद्यांवर झालेल्या निर्णयांची माहिती महापौर मुक्ता टिळक व पीएमपीचे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील काही महिन्यांपासून डिझेल व सीएनजी दरामध्ये सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे पीएमपीच्या दैनंदिन खर्चात लाखो रुपयांची वाढ झाली. परिणामी, तोटा वाढत चालल्याने प्रशासनाने तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढीचा पर्याय निवडला होता. त्यानुसार प्रति टप्पा दोन रुपये तिकीट दर वाढविण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. मात्र, मंडळाने भाडेवाढीला स्पष्टपणे नकार देत हा प्रस्ताव फेटाळून लावला.
भाडेवाढीबाबत महापौर म्हणाल्या, प्रशासनाने डिझेल व सीएनजी बसचे तिकीट व पास भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे. त्याऐवजी उत्पन्न वाढीसाठी अन्य उपाययोजना करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या प्रवाशांना चांगली सेवा देणे व बस वाढविण्याला प्राधान्य आहे. त्यानंतर उत्पन्न वाढीचा विचार केला जाईल. कोणतीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था फायद्यासाठी चालविली जात नाही. पण किमान खर्च भागणे आवश्यक आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासनाला उत्पन्न वाढीचे पर्यायी मार्ग शोधण्यास सांगितले आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जाईल. दोन्ही महापालिका त्यासाठी सहकार्य करतील. येत्या अर्थसंकल्पामध्ये हे नियोजन दिसेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.