Bhosari : मित्राचा मुलगा असल्याचे भासवून वृद्धाची फसवणूक

एमपीसी न्यूज – मित्राचा मुलगा असल्याचे भासवून एका इसमाने वृद्धाला सहा हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार कासारवाडी येथे मंगळवारी (दि. 23) दुपारी अडीच ते साडेतीन यावेळेत घडला. 

विनोद प्रमोद वाघचौरे (वय 81, रा. पवार बिल्डिंग, पुणे-मुंबई रस्ता, कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात इसम विनोद यांच्याकडे मंगळवारी दुपारी अडीच वाजता आला. त्याने विनोद यांचा मित्र प्रभाकर साखरे यांचा मुलगा असल्याचे सांगितले. सध्या तो गुजर गॅस येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत असल्याचेही तो म्हणाला. पुढील काही दिवसात घरगुती गॅस सिलेंडरचा संप होणार आहे. त्यामुळे ज्यांचे अॅडव्हान्स बुकिंग आहे, त्यांनाच गॅस सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळे अॅडव्हान्स बुकिंग करणे आवश्यक असल्याचे त्याने विनोद यांना सांगितले. विनोद यांचा विश्वास संपादन करून भामट्याने त्यांच्याकडून सहा हजार रुपये घेतले. त्यानंतर विनोद यांच्या गॅसची बुकिंग केली नाही, यावरून आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच विनोद यांनी तात्काळ भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

आरोपी भामट्याने वय अंदाजे 45 वर्ष आहे. अंगाने माध्यम, रंगाने सावळा आहे. उंची साधारणतः साडेपाच फूट, अंगात पोपटी रंगाचा शर्ट व ब्राऊन रंगाची पॅन्ट घातली आहे. पुढील वरील जबड्याचे दोन दात पडले आहेत. असे त्याचे वर्णन असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.