Talavade News : आईला मारल्याच्या आणि जमिनीच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून

दोघांना अटक

एमपीसी न्यूज – आईला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा तसेच जमिनीच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) तळवडे चाकण रोडवर तळवडे स्मशानभूमीकडे जाणा-या रोडवर घडली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

रोहन रवींद्र जगताप (वय 20, रा. निघोजे), विशाल अशोक चव्हाण (वय 21, रा. देहूगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांचा महाराज (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) नावाच्या साथीदाराच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत गायकवाड (रा. निघोजे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई कैलास उल्हारे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री देहूरोड पोलीस परिसरात गस्त घालत होते. तळवडे-चाकण रोडने गस्त घालत असताना तळवडे स्मशानभूमीकडे जाणा-या रस्त्यावर एकाचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याचा प्रकार देहूरोड पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

खून झालेल्या तरुणाची ओळख पटली नाही. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेच्या सर्व युनिटच्या टीम ऍक्टिव्ह करण्यात आल्या. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न ज-हाड यांना माहिती मिळाली की, खून झालेला तरुण खेड तालुक्यातील निघोजे गावातील आहे. त्यानुसार पोलिसांनी निघोजे येथे जाऊन त्याबाबत चौकशी केली असता मयत संकेत गायकवाड याचे त्याच्या नातेवाईकांसोबत जमिनीच्या कारणावरून वाद सुरु असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी वाद असलेले संशयित आरोपी रोहन जगताप आणि विशाल चव्हाण यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला रोहन जगताप याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रडण्याचे आणि खूप दुःख झाल्याचे नाटक केले. तसेच मयत संकेत हा आपला मावसभाऊ असल्याचेही सांगितले.

पोलिसी खाक्यासमोर त्याची ही बनावगिरी जास्त वेळ चालली नाही. रोहन याने त्याचा साथीदार विशाल आणि महाराज यांच्यासोबत मिळून हा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. मयत संकेत याने रोहनच्या आईला पोटात लाथाबुक्क्या मारून शिवीगाळ केली होती. तसेच त्यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद सुरु होते. त्याच्या रागातून संकेतचा खून करण्याचा कट रचला.

शुक्रवारी आरोपी ओटास्कीम निगडी येथून निघोजे गावाकडे जात असताना तळवडे ब्रिजजवळ संकेत थांबल्याचे दिसले. आरोपींनी संकेतला गोड बोलून ब्रिजच्या खाली नेले. तिथे त्याच्यासोबत भांडण करून त्याला दगडाने मारहाण केली. त्याचा चेहरा ओळखता येऊ नये यासाठी आरोपींनी मोठमोठे दगड संकेतच्या चेह-यावर मारून त्याचा चेहरा विद्रुप करून टाकला.

चोवीस तासात पोलिसांनी मयताची ओळख पटवून आरोपींना अटक केली आहे. आरोपींना देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, उपनिरीक्षक प्रसन्न ज-हाड, गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, हजरतअली पठाण, सचिन मोरे, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमंते, त्रिनयन बाळसराफ, प्रमोद ढाकणे, जगदीश बुधवंत यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.