Bhosari : महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मोशी कचरा डेपोचा बफर झोन झाला कमी – कल्याण पांचाळ

एमपीसी न्यूज – मोशी येथील कचरा डेपो हलविण्यासाठी स्थानिकांनी ‘कचरा डेपो उठाओ’ आंदोलन केले. त्याबाबत तत्कालीन पुढा-यांनी नागरिकांची जराही बाजू ऐकून घेतली नाही. हा कचरा डेपो वाढत गेला आणि 2009 मध्ये बफर झोन पडला. हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी कसोशीने प्रयत्न केले. बफर झोन 500 मीटर वरून 100 मीटरवर आणला. यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे कचरा डेपो परिसरातील नागरिकांच्या समस्यांसाठी लढा देणारे कल्याण पांचाळ यांनी सांगितले.

मोशी मधील कचरा डेपो येथे पिंपरी-चिंचवडमधील सर्व भागांतून कचरा संकलित केला जातो. 2009 साली कचरा डेपो परिसरातील प्रभावित क्षेत्र म्हणजे ‘बफर झोन’ असे प्रशासनाने घोषित केले होते. या बफर झोन नुसार कचरा डेपोच्या व्यासातील 500 मीटरपर्यंतच्या हद्दीमध्ये कोणत्याही पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार नाहीत, असे सांगण्यात आले होते.

पांचाळ म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी कचरा डेपो हलविण्यासाठी तत्कालीन अनेक लोकप्रतिनिधींच्या दारी फे-या मारल्या. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी नागरिकांचे काहीही म्हणणे ऐकून घेतले नाही. उलट हा कचरा डेपो शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. हा इथेच होणार, अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान, नागरिकांनी ‘कचरा डेपो उठाओ’ आंदोलन केले. स्थानिक नागरिकांच्या आरोग्य, सामाजिक आणि अन्य कोणत्याही प्रकारच्या समस्यांना लोकप्रतिनिधींनी लक्षात घेतले नाही. राज्यासह देशभरातून या भागात नागरिक कामाच्या निमित्ताने स्थलांतरित झाले आहेत. त्यांनी पै-पै जमा करून इथे जमीन, सदनिका घेतल्या आहेत. अचानक 500 मीटरचा बफर झोन केल्याने त्यांना मिळणा-या सुविधा बंद झाल्या आहेत.

पांचाळ पुढे म्हणाले, 2014 साली आमदार महेश लांडगे यांच्यावर विश्वास ठेऊन सर्वांनी त्यांना विधानसभेत पाठवले. त्यानंतर त्यांनी मोशी करांच्या जिव्हाळ्याचा असलेला बफर झोनचा प्रश्न सोडवला आहे. बफर झोनची हद्द 500 मीटरवरून 100 मीटरपर्यंत कमी केली आहे. पुढील काळात बफर झोन पूर्णतः रद्द करून मोशी करांना दिलासा मिळणार असल्याची आशा इथल्या नागरिकांना आहे. नागरिकांच्या मिळकती ‘बफर झोन’ हद्दीत असल्याचा शिक्का निर्देशित केला जात होता. बफर झोनची हद्द कमी करण्याबाबत सल्लागार म्हणून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (नीरी) या केंद्र सरकार संचलित संस्थेची निवड करण्यात करण्यात आली. त्यांनी सूचवलेल्या सर्व प्रकल्पांची अर्थात वेस्ट टू एनर्जी, ट्री प्लांटेशन, लिचेट ट्रिटमेंट प्लँट आदी प्रकल्पांचे काम सुरू करण्यात आले.

स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने बफर झोनची हद्द 500 मीटरवरुन 100 मीटर इतका कमी करण्याबाबतचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला.‘बफर झोन’ची मर्यादा कमी केल्यामुळे  सुमारे साडेसहा हजार कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. या भागातील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था यासह पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, ‘नीरी’ संस्थेने सूचवलेल्या सर्व प्रकल्पांची पूर्तता झाल्यानंतर ‘बफर झोन’ची हद्द 100 मीटरहून 30 मीटरपर्यंत कमी होईल, असा विश्वास देखील कल्याण पांचाळ यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.