Pune News : सराईत चोरट्यांना खडक पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन केल अटक

३ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज : नवरात्रोत्सवात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सोनसाखळ्या हिसकाविण्याच्या तयारीत असलेल्या सराईत चोरट्यांना खडक पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक केले. त्यांच्याकडून ३ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. 

सचिन नरहरी पेशवे (वय ३६) आणि प्रेम शालीकराम खत्री (वय २९ दोघेही रा. येवलेवाडी, मूळ- नागपूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सचिनविरुद्ध ३९ तर प्रेमविरुद्ध १० गुन्हे दाखल आहेत.

शहरातील विविध भागात सोनसाखळी चोरी करणारे सराईत खडीमशीन चौकातून ये-जा करीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अमेय रसाळ आणि समीर माळवदकर, बंटी कांबळे यांना मिळाली. त्यानुसार खडक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून खडीमशीन चौकात सापळा रचला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या सचिन आणि प्रेमला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दुचाकी दामटून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी दुचाकीवर त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शुक्रवार पेठे, यमुनानगर, निगडी, संभाजीनगर, चिंचवड परिसरातील जेष्ठ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविल्याची कबुली दिली. ही कामगिरी  अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदीप पाटील, सागर केकाण, अमेय रसाळ, रवी लोखंडे, रोहन खैरे, योगेश जाधव यांच्या पथकाने केली.

चौकट-नागपूर सेंट्रल जेल तोडून पळाला होता आरोपी

सचिन पेशवे हा नागपूर, अमरावती जिल्ह्यातील अट्टल सोनसाखळी चोर असून त्याच्याविरुद्ध तब्बल ३९ गुन्हे दाखल आहेत. दीड महिन्यांपुर्वी तो नागपूर सेंट्रल जेलमधून शिक्षा भोगून बाहेर आला आहे.  त्याचा साथीदार प्रेम खत्री हा नागपूर, मध्यप्रदेशमध्ये वाहनचोरी, घरफोडी गुन्ह्यात सराईत आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध १० गुन्हे दाखल आहे. २०१५ साली तो नागपूर सेंट्रल जेल तोडून पळाला होता. त्यानंतर त्याला शोधून अटक करण्यात आली होती. चार महिन्यांपुर्वी तो कारागृहाबाहेर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.