Chakan : चोरीचा प्रयत्न फसला अन, चोर फरशीवर आपटला

पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

0

एमपीसी न्यूज – रात्रीच्या वेळी चोरी करण्यासाठी घराचा दरवाजा उघडत असताना घरातील सदस्य जागे झाले. घरातील लोकांनी चोराला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. मात्र चोर भिंतीवरून उडी मारून पळून जाताना फरशीवर जोरात आपटला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला इजा झाली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 21) पहाटे अडीच वाजता खेड तालुक्यातील निघोजे गावात घडला.

अरुण रामचंद्र किरवे (वय 45, रा. ओटास्कीम, निगडी) असे चोरट्याचे नाव आहे. याबाबत बापू तुकाराम आल्हाट (वय 26, रा. आल्हाटवस्ती, मोई रोड, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण हा फिर्यादी आल्हाट यांच्या घरात चोरी करण्यासाठी शनिवारी पहाटे अडीच वाजता आला. आल्हाट यांच्या घराचा दरवाजा उघडत असताना दरवाजाचा आवाज झाला आणि त्या आवाजाने आल्हाट व त्यांच्या घरातील सदस्य जागे झाले. आल्हाट यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाऊ लागला.

भिंतीवरून उडी मारून जात असताना आरोपी अरुण फरशीवर जोरात आपटला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला दुखापत झाली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला चाकण येथील केला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यामध्ये पोलिसांनी बापू तुकाराम आल्हाट, बाळासाहेब तुकाराम आल्हाट आणि अन्य तीन जणांवर अरुण किरवे याला टणक वस्तूने मारून जखमी केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी बापू आल्हाट यांना अटक केली आहे. अरुण हा आल्हाट यांच्या घराचा दरवाजा उघडत असताना तो चोरी करत असल्याचा संशय आल्याने आल्हाट आणि त्याच्या साथीदारांनी मिळून टणक वस्तूने मारून अरुणला जखमी केले असल्याचे पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III