Pune Crime News : शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच

वेगवेगळ्या तीन घटनात लाखोंचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असणारे घरफोड्यांचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. भारती विद्यापीठ, विमानतळ आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा घरफोड्या झाल्या असून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. 

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक येथील ज्ञानेश्वर शिवानंद कोळी यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने जबरी चोरी केली. या चोरट्याने कोळी यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी पत्र्याच्या कपाटाचे लॉकर उचकटून रोख 25 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोझेनगर येथील गणेश अजाबराव इंगळे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील, हॉलमधील एकूण 60 हजार रुपयांचे दागिने टीव्ही, लॅपटॉप असा ऐवज चोरून नेला. विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गोकुळ नगर येथील समृद्धी ब्लॉसम विंग या सोसायटीतील रवींद्र संजय पिसाळ यांच्या घरातही चोरीचा प्रकार उघडकीस आलाय. रवींद्र पिसाळ हे गावी गेले असताना आरोपींनी सेफ्टी डोर चा कडीकोयंडा तोडून घरांमध्ये प्रवेश केला आणि सोन्या चांदीचे 38 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.