Talegaon Dabhade : रस्त्यावर पडलेली केबल दुचाकीत अडकून भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष्याचा बळी

एमपीसी न्यूज – रस्त्यावर पडलेली केबल दुचाकीला अडकून झालेल्या विचित्र अपघातात भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौक ते स्टेशन रस्त्यावर काका हलवाई स्वीट सेंटरच्या समोर आज (शुक्रवारी) दुपारी चारच्या सुमारास झाला.

सुदाम तुकाराम भेगड़े (वय ४८ रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे), असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. या अपघात त्यांच्या छाती व बरगड्यांना जबर मार लागला. अंतरस्त्राव झाल्याने सोमटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला.

_MPC_DIR_MPU_II

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुदाम भेगडे हे तळेगाव स्टेशन येथून बुलेट गाडीवरून घराकडे निघालेले असताना रस्त्यात पडलेली केबल त्यांच्या गाडीला अडकली व गाडी त्यांच्या अंगावर पडली. ही केबल घटनास्थळी मागील तीन- चार दिवसांपासून अशीच पडलेली होती. नगरपरिषद प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली असती तर ही दुर्घटना टळली असती.

सुदाम भेगडे हे भेगडे भारतीय जनता पक्षाचे आणि भेगडे तालीम मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते. तळेगाव शहर भाजपचे उपाध्यक्ष अजय भेगडे व कामगार नेते संजय भेगडे यांचे ते धाकटे बंधू होत. सुदाम भेगडे यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त समजताच भेगडे आळी परिसरावर शोककळा पसरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.