Chinchwad News : चाक निखळल्याने उसाची ट्रॉली उलटली, गाड्यांचे नुकसान

एमपीसी न्यूज – ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक निखळल्याने मोहननगर येथे ट्रॉली उलटली. ट्रॉलीतील ऊस भर रस्त्यात पडल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. मंगळवारी (दि. 30) सकाळी ही घटना घडली.

पिंपरी चिंचवड शहराच्या बाजूला असलेल्या मोशी, दिघी, च-होली, चिखली परिसरातील शेतकरी त्यांचा ऊस हिंजवडी जवळील कासारसाई येथील साखर कारखान्यात पाठवतात. वरील परिसरातील उसाची वाहतूक चिंचवड, थेरगाव, वाकड मार्गे हिंजवडी अशी केली जाते.

मंगळवारी सकाळी एक ट्रॅक्टर उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन कासारसाई कारखान्यात जात होता. चिंचवड स्टेशन येथे पिंपरी पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला वन वे मध्ये ट्रॉलीचे मागील एक चाक निखळले. यामुळे एक ट्रॉली उलटली. सुदैवाने उसाच्या ढिगाऱ्यात कुणीही अडकले नाही. रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दोन कारला ऊस लागल्याने कारचे नुकसान झाले आहे.

भर रस्त्यात ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान रस्त्यावर पडलेला ऊस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. अनेकांनी रस्त्यावर पडलेले ऊस काढून सुद्धा नेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.