Chakan : मोटारीची काच फोडून साडेतीन लाख लंपास

रासे फाटा येथील प्रकार

एमपीसी न्यूज – दसरा सणासाठी गावाहून आणलेली व जमीन विक्रीच्या व्यवहारात मिळालेली एकूण साडेतीन लाखांची रोकड कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहनाच्या गाडीची पुढील बाजूची काच फोडून लांबविल्याचा धक्कादायक प्रकार चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील रासे फाटा (ता. खेड) येथे घडली असून चाकण पोलिसांनी याप्रकरणी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दिलीप अशोक वाबळे (वय – ३५ वर्षे, रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाबळे यांनी त्यांच्या मालकीची कार (क्र. एम.एच. १२, जे.के. ४२७८ ) शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान त्यांचे रासे फाटा (ता. खेड) येथील साडू बबन वैजनाथ भंवर यांच्या घरासमोर उभी केली होती. त्यावेळी कोणीतरी अज्ञात भामट्यांनी कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता गाडीच्या पुढील बाजूची काच फोडून गाडीत गियर बॉक्स जवळ ठेवलेली जमीन विक्री व्यवहारात मिळालेले दोन लाख रुपये व गावाहून दसरा या सणासाठी आणलेले दीड लाख असे एकूण साडेतीन लाख रुपये घेऊन पोबारा केला.

वाबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी अज्ञात भामट्या विरुद्ध भा.द.वि.कलम ३७९ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.