Nashik News : वैदू समाजाची जात पंचायत ‘अंनिस’ने लावली उधळून

एमपीसी न्यूज : प्रेम विवाहाला विरोध करुन त्याविरुध्द जोडप्याला शिक्षा करण्याच्या उद्देशाने भरविण्यात आलेली वैदु समाजाची जातपंचायत अंधश्रध्दा निमूर्लन समितीच्या पदाधिकार्‍यांनी हस्तक्षेप करुन उधळून लावली. अंनिसने मदत मागितल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर जात पंचायत भरविणार्‍याना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने जात पंचायत विरोधी कायदा केला आहे. त्यामुळे काही जात पंचायत बंद  झाल्या.  पण तरी देखील काही जात पंचायत छुप्या पद्धतीने चालूच आहे. अशीच जात पंचायत भर दिवसा नाशिक येथे भरविण्यात आली होती. अधिक माहिती अशी की सुरगाणा येथील वैदू समाजाच्या  एका मुलीने तिच्याच जातीतील मुलाशी प्रेमविवाह केला. जात पंचायतने या प्रेमविवाहाला विरोध करत या प्रकरणी न्याय निवाडा करण्यासाठी जात पंचायत भरवली होती.

म्हसरुळ भागातील वैदुवाडी येथे जात पंचायत भरविण्यात आली होती. अंनिसच्या पदाधिकार्‍यांना या अनिष्ठ प्रथेची माहिती कळताच त्यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे याच्याकडे निवेदन देऊन या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी मांढरे यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक यांना कारवाईचे आदेश दिले.

तसेच अंनिसच्या कार्यकर्त्यानी म्हसरूळ पोलीस ठाणे गाठले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. आर. ढोकणे यांची भेट घेत कारवाईची मागणी केली. पोलिसानी तात्काळ वैदु वाडी येथील म्हसोबा मंदिर परिसरात धाड टाकली. या ठिकाणी करोनाचे  नियम पायदळी तुडवत दोनशे लोकांची  गर्दी जमली होती. तेथे जात पंचायत होत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी मुख्य पंच व इतर लोकांना पोलीस ठाण्यात आणले व बंदी असतानाही जात पंचायत भरवल्यामुळे पंचांसहित संबंधितांचे जाब नोंदवले.

या मोहिमेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे, ऍड समीर शिंदे, कोमल वर्दे, नितीन बागुल यांनी परिश्रम घेत ही जात पंचायत उधळून लावली.

या घटनेमुळे अजुनही छुप्प्या पध्दतिने जात पंचायत भरविण्याच्या अनिष्ठ प्रथा सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जातपंचायत भरविणार्‍याविरुध्द अंधश्रध्दा निर्मुलन कायद्या अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करावी – कृष्णा चांदगुडे, अंनिस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.