Pune : मध्य रेल्वेची डिजिटल मोबाईल तिकीट सेवा सुरु

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेने उपनगरीय रेल्वे स्थानकांनंतर आता अन्य रेल्वे स्थानकांवर देखील डिजिटल मोबाईल तिकीट सेवा सुरु केली आहे. शुक्रवार (दि. 12) पासून मध्य रेल्वेच्या सर्व गैर उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेने कागद विरहित तिकीट सेवा सुरु करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी युटीएस मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. त्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट काढता येत आहे. परंतु आजपर्यंत ही सेवा केवळ उपनगरीय रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होती. उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रवाशांचा वैधता प्रतिसाद पाहता रेल्वे या सेवेचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे युटीएस मोबाईल अॅप्लिकेशन सुविधा आता उपनगरीय रेल्वे स्थानकांसह अन्य सर्व रेल्वे स्थानकांवर सुरु होणार आहे.

युटीएस मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अगदी सहज तिकीट काढता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि रेल्वे प्रशासनाचा कागद या दोन गोष्टींची बचत होणार आहे. त्यासोबतच तिकीट काढण्यासाठी आता रांगेतही उभे राहावे लागणार नाही. तिकीट निरीक्षकांना (टीसी) पाहून जर कोणी तिकीट काढण्याचा प्रयत्न करू लागला तर त्यांचा हा प्रयत्न फसणार आहे. कारण युटीएस अॅप्लिकेशन रेल्वे स्थानकावर चालणार नाही. रेल्वे स्थानकांपासून वीस मीटर अंतर दूर गेल्यानंतर हे अॅप्लिकेशन सुरु होणार आहे. त्याचबरोबर विनातिकीट प्रवास करून जर टीसी समोर आल्यानंतर मित्रांना किंवा नातेवाईकांना जर तिकीट काढण्यास सांगितले, तर त्यावर उपाय करण्यासाठी एखाद्या मोबाईल फोनमध्ये काढलेले तिकीट कुणालाही एसएमएस द्वारे पाठवता येणार नाही. तसेच त्याचा स्क्रीन शॉट देखील पाठवता येणार नाही. यामुळे तिकिटांमधील पारदर्शकता उत्तम राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.