Hinjawadi News : गटार आणि रस्त्याच्या कामांना हरकत घेणाऱ्यांना मुळशी पंचायत समितीच्या सभापतीने दाखवली पिस्तुल

एमपीसी न्यूज – गटार आणि रस्त्याच्या कामाला जमीन मालकाने हरकत घेतल्याने मुळशी पंचायत समितीच्या सभापतीने जमीन मालकाला पिस्तुल दाखवले. तसेच सभापती आणि त्यांच्या सहा साथीदारांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. याबाबत सभापतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर शासकीय कामास अटकाव केल्याप्रकरणी जमीन मालकासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 4) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज दोन, माण येथे घडली.

रामनारायण एकनाथ पारखी (63, रा. माण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सभापती पांडुरंग मारुती ओझरकर (रा. माण), नितीन बाळू कुंटे (वय 25, रा. चांदे), गणेश शिंदे, रोशन बाळकृष्ण ओझरकर (वय 28, रा. माण), रामदास गवारे, नवनाथ आनंदा गवारे उर्फ गवारी, यशवंत गवारे (सर्व रा. माण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सर्वे नं 594 मध्ये जमीन आहे. त्यापैकी सर्वे नं 305 मध्ये पाच एकर असलेल्या जमिनीपैकी तीन एकर जमीन एमआयडीसीने आरक्षित केली आहे. राहिलेली दोन एक जमिन ही फीर्यादी यांच्या सख्खे व चुलत भावांच्या नावे आहे. त्यामधुन माण ग्रामपंचायत तर्फे गटार रस्ता व इतर कामे केली जात आहेत. या कामांसाठी फिर्यादी यांची हरकत आहे.

तरीही एस के एंटरप्रायझेस तर्फे खोदकाम चालू केले. त्यास फिर्यादी व त्यांच्या भावांनी हरकत घेतली आणि पावसाळा संपल्यावर निर्णय घेण्याचे ठरले. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती ओझरकर यांनी त्यांच्याकडील रिव्हॉलवर दाखवून शिवीगाळ करत सिमेंटच्या ब्लॉकने फिर्यादी यांचा पुतण्या सुरज पारखी याच्या डोक्यात मारुन जखमी केले.

फिर्यादी यांचा मुलगा विश्वनाथ रामनारायण पारखी यास हाताने मारहाण केली. तसेच आरोपी नितीन, गणेश, रोशन यांनी दगडाने मारहाण केली. तसेच आरोपी रामदास, नवनाथ, यशवंत यांनी संगनमत करुन अन्य आरोपींना एकत्र बोलावुन व रोडवर गाडया आडव्या लावुन त्यांचा रस्ता आडवून मारहाण व शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी नितीन, रोशन, नवनाथ या तिघांना अटक केली आहे.

त्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी महेश रामहरी पारखी, जय रामहरी पारखी, नितीन पारखी, सोमनाथ प्रकाश कसाळे, रामहरी पारखी, सुरज पारखी, विश्वनाथ पारखी (पुर्ण नाव माहीती नाही. सर्व रा. माण ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भरत रावण पाटील (वय 55 रा. कोथरूड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास फक्कड गवारे यांच्या मालकीच्या जागेवर ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते. त्यावेळी आरोपींनी एकत्र येऊन ते काम बंद पाडले. आरोपींनी शासकीय कामास अटकाव केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.