Chakan : चाकण एमआयडीसीत शांतता राखण्याचे आव्हान

एमपीसी न्यूज : चाकण एमआयडीसी भागात (Chakan) लूटमारीचे प्रकार वाढत आहेत. भररस्त्यात हत्यारांचा धाक दाखवून, खिशातील ऐवज लुटण्याच्या घटना वाढत आहेत. निघोजे हद्दीत महिंद्रा कंपनीच्या समोर चाकूचा धाक दाखवून कामगाराला लुटणाऱ्या एका चोरट्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याचा प्रकार नुकताच घडला. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांनी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चाकण एमआयडीसी मध्ये कामावरून सुटल्यानंतर सायंकाळी व रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या कामगारांना ‘लक्ष्य’ केले जात आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे कामगारांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारांचा प्रतिकार केल्यास प्राणघातक हल्ला व खून केल्याचे प्रकारही चाकण औद्योगिक भागात घडत आहेत.

चाकण एमआयडीसीसाठी महाळुंगे एमआयडीसी हे स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आले. औद्योगिक भागात शांतता असावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. मात्र औद्योगिक भागात अनेक जमीन व्यवहार, ताबे, तडजोडी व आर्थिक व्यवहारांशी संबंधित अन्य कामात अधिक रस दाखवण्यात येत असल्याने एमआयडीसी मधील शांतता धोक्यात येत आहे.

अवैध व्यवसाय थोपवण्याचे आव्हान :

चाकण एमआयडीसी मध्ये दरोडे, वाहन चोऱ्या, भुरट्या चोर्‍या, अवैध गॅस व दारू विक्री, मटका, हॉटेल मधील गैरप्रकार , एमआयडीसी परिसरात घडणार्‍या गुन्हेगारीवर आवर घालण्यासाठी प्रयत्न करण्याची नागरिकांची मागणी आहे . औद्योगिक भागात पोलिसांच्या समोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान (Chakan) असतानाच स्थानिक गुन्हेगारांना काबूत ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे. सट्टा, चोरी, जुगार, मटका, रोड रोमिओ, लुटमार , अवैध वाहतूक, बेकायदा दारू विक्री यांसारख्या प्रवृत्ती सामाजिक स्वास्थाच्या आणि कर्तव्याचा विचार करून थोपविण्याची गरज आहे.

कामगारांच्या पगारावर लक्ष :

चाकण एमआयडीसी मध्ये अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवून गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. लुटमारीच्या घटना औद्योगिक भागात कामगारांच्या पगार होण्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पगाराच्या दिवसात कामगारांना अडवून हत्यारांचा धाक दाखवत लूटमार केल्याचे प्रकार चाकण एमआयडीसी या भागात वारंवार घडत आहेत. पादचारी, दुचाकीस्वार कामगारांना लक्ष्य केले जात आहे.

Chakan : चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होईना; अनुदानापासूनही वंचित राहण्याची शक्यता

माथाडीचा उच्छाद कमी :

चाकण एमआयडीसीत माथाडी व ठेकेदारीतून माध्यमातून कोट्यावधी रुपयांची रसद सुरु असलेल्या तत्कालीन गुन्हेगारी विश्वातील अनेक जण आता थंड बस्त्यात गेले आहेत. माथाडीच्या आडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळणारे अनेक जण पोलिसांनी कारवाईच्या कात्रीत घेतले आहेत. मात्र नव्याने उदयास येत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचा, कंपन्यांमध्ये काम मिळवण्यासाठी राजकीय वरदहस्ताने दडपशाही करणाऱ्या मंडळीना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.