Junnar News : अजितदादांच्या मनात काय चाललंय हे ओळखण्यासाठी मुख्यमंत्री शिकणार ‘इंगीत विद्या शास्त्र’

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांना येत असलेली इंगीत विद्या शास्त्र ही भाषा अजितदादांनी अवगत केली आहे. त्यांना काय म्हणायचे आहे, हे दादांच्या डोळ्यावरुन आमच्या लक्षात येते, असे जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी भाषणात सांगितले.

तोच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुफान टोलेबाजी केली.  अजितदादांच्या मनात काय चाललंय हे ओळखण्यासाठी आपण ‘इंगीत विद्या शास्त्र’ ही भाषा शिकणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले अन्  शिवनेरी गडावर एकच हशा पिकला. दादांनी मास्क, गॉगल घातला तरी त्यांच्या मनात काय चाललंय हे मला ओळखता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवनेरी गडावर शिवजंयती सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे, अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, विनायक मेटे यांच्या उपस्थितीत साजरा झाला.

जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आपल्या भाषणात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना 14 व्या वर्षी सात भाषा येत होत्या. त्यात मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दु, पारशी, मोडी लिपी अशा सात भाषांचा समावेश होता. महाराजांना आणखी एक भाषा येत होती ती म्हणजे ‘इंगीत विद्या शास्त्र’. दुस-याच्या मनात नेमकं काय चाललयं ते ओळखायचं आणि त्याबाबत महाराज मावळ्यांना आदेश द्यायचे.  तशाच प्रकारचे इंगीत विद्या शास्त्र अजितदादांनी अवगत केले आहे. त्यांना काय म्हणायचे आहे, हे दादांच्या डोळ्यावरुन आमच्या लक्षात येते”.

बेनके यांच्या भाषणातील हाच धाग पकडत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना इंगीत विद्या शास्त्र ही एक भाषा येत होती. आणि ती अजितदादांना येते. पण, आता मीच ती भाषा शिकणार आहे. का, दादांच्या मनात काय चाललं आहे ते कळले पाहिजे. इथे आल्यानंतर ही भाषा कळली. आता मी ही भाषा शिकतो. त्यामुळे दादांनी मास्क, गॉगल घातला तरी त्यांच्या मनात काय चाललंय हे मला ओळखता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यावरुन उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.