Chinchwad News : इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चूल मांडो आंदोलन

एमपीसी न्यूज – पेट्रोल, डिझेल आणि गॅस दर वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथे आंदोलन करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी रविवारी (दि. 28) आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, संगीता ताम्हाणे, मनीषा गटकळ, पल्लवी पांढरे, आशा शिंदे, सविता धुमाळ, दीपाली देशमुख, कविता आल्हाट, सुप्रिया भिंगारे, विशाल काळभोर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

‘छोडो पीएम सारे काम, कम करो गॅस के दाम’, ‘सर्वसामान्यांचा एकच नारा, महागाई कमी करा’, ‘अक्कड बक्कड बंबे बो, अस्सी नब्बे पुरे सौ’, ‘मोदींजींची खरी बात, गरिबांच्या पोटावर लाथ’, ‘केंद्र सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय’, ‘गांधी लडे थे गोरों से, हम लडेंगे चोरों से’, तख्त बदल दो ताज बदल दो, गद्दारो का राज बदल दो’, ‘महागाईचा तडका, पेट्रोलचा भडका’ अशा घोषणा देत महिलांनी चक्क पेट्रोल पंपावर लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरखाली चूल मांडो आंदोलन केले.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “फेब्रुवारी या महिन्यात 25 रुपये, 50 रुपये आणि 25 रुपये अशी तीन वेळेला गॅस दरवाढ केली आहे. जानेवारी पूर्वी 594 रुपयांना मिळणारा सिलेंडर आज 819 रुपयांना मिळत आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जाहिरातींसाठी पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वापरण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या पैशांमधून या जाहिराती केल्या आहेत.

उज्वला योजने अंतर्गत मोफत शेगडी देण्यात आली पण गॅस दरवाढ केल्यामुळे मिळालेली शेगडी घरात धूळ खात पडलेली आहे. पेट्रेलियम मंत्र्यांकडे देखील याचे निश्चित उत्तर नाही. हिवाळा असल्याने दरवाढ होत आहे. हिवाळा संपल्यानंतर भाव कमी होतील असे सांगून हात वर केले जातात. केंद्र शासनाने उज्वला योजनेसारख्या फसव्या योजना आणल्या आहेत.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.