Pune : यंदा तरी गणेश मंडळ मांडवाची आचारसंहिता पाळणार का ? 

एमपीसी न्यूज – पुणे आणि गणेशोत्सव हे समीकरण खूप दिवसांपूर्वी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव पुण्यातून सुरुवात केली पण जसजसे दिवस गेले तसतसा पुण्यातील गणेशोत्सवाला भव्य स्वरूप आलं. मात्र आता मांडवाच्याआचारसंहिता वरून महापालिका आणि गणेशोत्सव मंडळ यांच्यात वाद सुरू झाला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांसंदर्भात महापालिकेने धोरण तयार केले असले तरी महापालिकेच्या या धोरणाची शहरातील गणेश मंडळांकडून सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसले आहे. मंडप उभारताना पदपथ आणि रस्त्यांवर केले जाणारे अतिक्रमण, परवानगी न घेता किंवा उंचीच्या मर्यादेचे पालन न करता होणारी मंडपांची उभारणी, वाहतुकीला अडथळा ठरणारे मंडप असे धोरणातील तरतुदींशी विसंगत प्रकार गेल्या वर्षी दिसले होते. शहरातील साडेचार हजार सार्वजनिक गणेश मंडळांपैकी अवघ्या दीड हजार मंडळांनीच गेल्या वर्षी मंडप परवानगी घेतली होती. या पाश्र्वभूमीवर यंदाही महापालिकेचे आदर्श मंडप धोरण कागदावरच राहण्याची दाट शक्यता आहे.

सार्वजनिक समारंभाच्या आणि उत्सवांच्या कालावधीत रस्त्यांवर, पदपथांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मंडप उभारणीचे सर्वकष धोरण निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागानेही ‘महापालिका-मंडप धोरण-2015’ तयार केले. या धोरणातील तरतुदींचे सर्रास उल्लंघन सार्वजनिक गणेश मंडळांकडून होत असल्याचे गेल्यावर्षी स्पष्ट झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर यंदा देखील गणेश मंडळ आणि महापालिका यांच्या वाद रंगण्याचे चिन्ह आहेत.

मंडप उभा करण्यासाठीच्या महत्वाच्या तरतुदी

मंडप उभारताना पदपथांवर खड्डे घेऊ नयेत. सार्वजनिक ठिकाणी खड्डे घेतल्यास प्रती खड्डा 2 हजार रुपये याप्रमाणे दंडाची आकारणी करण्यात येईल. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. काँक्रिट रस्त्यावर खड्डे घेण्यास पूर्णपणे मज्ज्वाव असून मंडळाने सातत्याने खड्डे घेतल्याचे आढळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित केली जाईल.

उत्सवाच्या कालावधीत पाणी आणि वीज वापरासाठी तात्पुरते जोड घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या रस्त्यावरील विद्युत खांबावरून अनधिकृतपणे वीज-जोडणी घेतल्यास स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची तरतूद.

मंडप किंवा स्टेज किंवा रनींग मंडपांच्या झालरींवर संबंधित मंडळाच्या सौजन्याने अन्य उत्पादकांच्या साहित्य किंवा वस्तूंची अनधिकृत जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. यासाठी महापालिकेकडून अधिकृत परवानगी घ्यावी लागेल. मंडपाच्या 50 मीटर अंतरामध्ये स्थानिक पोलीस आणि वाहतूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि जाहिरातीपोटीचे निश्चित केलेले शुल्क जमा करणे बंधनकारक आहे.

मंडप परवान्याची मुदत संपल्यानंतर संबंधितांनी तीन दिवसांच्या आत स्वखर्चाने मंडप, रस्त्यावरील देखावे, विटांची बांधकामे, देखाव्यातील मूर्ती आणि अन्य साहित्य रस्त्यावरून ताबडतोब हटविणे बंधनकारक आहे. या संपूर्ण भागाची साफसफाई करण्याची जबाबदाराही संबंधित मंडळांची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.