Pimpri: बोपखेलच्या प्रश्नाबाबत आयुक्त असंवेदनशील – नगरसेवक डोळस 

एमपीसी न्यूज – बोपखेलवासियांच्या प्रश्नाबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर संवेदनशील नाहीत. त्यांनी आजपर्यंत एकदाही बोपखेलवासियांची समस्या जाणून घेतली नाही. इतर कामांना वेळ मिळतो तर बोपखेलवासियांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही का? असा सवाल स्थायी समितीचे सदस्य विकास डोळस यांनी उपस्थित केला. महापालिका प्रशासन गतीमन नसल्याचा हल्ला करत बोपखेल महापालिकेत नसल्याचे जाहीर करा म्हणजे नागरिकांची करातून तरी सुटका होईल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. विषयपत्रिकेवर बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील पुल बांधण्यास येणा-या चार कोटी 26  लाख रूपये खर्चास मान्यता देण्याचा विषय होता. त्यावर बोलताना विकास डोळस म्हणाले, पुलाचे काम किती दिवसात मार्गी लागेल हे प्रशासनाने सांगावे. प्रशासनाला कालावधी सांगता येत नाही. बोपखेलचा 2015 मध्ये रस्ता बंद झाला आहे. तरीही, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आजही जागा हस्तांतरणास किती कालावधी लागेल हे प्रशासनाला सांगता येत नाही. कार्यक्रम निश्चित करणे अपेक्षित होते. बोपखेलबाबतची प्रशासनाला कोणतीही माहिती नाही. याउलट दुसरा प्रकल्प असता तर प्रशासनाकडे त्याची सविस्तर माहिती असते. यातून फायदा होणार नसल्यानेच प्रशासन जाणीवपुर्वक बोपखेलवासियांकडे दुर्लक्ष करत आहे.

प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एकदाही बोपखेलला भेट दिली नाही. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. आयुक्त बोपखेलच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील आहेत. बोपखेलच्या प्रश्नांबाबत आत्तापर्यंत लोकप्रतिनीधींनीच बैठका लावल्या आहेत. प्रशासनाने पुढाकार घेऊन कोणाशी चर्चा केली नाही. बैठक घेतली नाही. प्रशासनाला तळमळच नाही. बोपखलेच्या प्रश्नाबाबत प्रशासन गतीमान नाही, असे डोळस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.