Pimpri : गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आयुक्तालय सज्ज

अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची माहिती 

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवासाठी अवघे दोन आठवडे कालावधी शिल्लक आहे. सर्व स्तरातून गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. संपूर्ण 10 दिवसांच्या उत्सवात शहरात कायदा आणि सुव्यवस्था पाळणे ही पोलीस प्रशासनाची सर्वात मोठी जबाबदारी असते. पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले असून आयुक्तालय सुरु झाल्यापासून महिन्याभराच्या कालावधीत मोठ्या उत्सवांना सुरुवात होत आहे. एवढ्या अल्प काळातही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येणा-या सर्व उत्सवांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी सज्ज झाले आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) ब्रम्हानंद नाईकवाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील आदी उपस्थित होते.

अपर पोलीस आयुक्त रानडे म्हणाले की, “येत्या काही दिवसात दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव आणि मोहरम हे उत्सव सुरु होत आहेत. या उत्सवांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय पूर्ण क्षमतेने तयार आहे. शहरातील सर्व क्षेत्रातील अधिकारी, प्रमुख मंडळांचे प्रमुख, महापालिका प्रशासन यांच्यासोबत बैठकांच्या माध्यमातून संपर्क होत आहे. मार्गदर्शक सूचनावली आणि कायद्याची नियमावली सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे.

पोलीस ठाणे आणि विभागीय पातळीवर शहरातील गणेश मंडळे आणि दहीहंडी उत्सव प्रमुखांच्या बैठका होत आहेत. या स्तरावरील बैठका येत्या दोन दिवसात पूर्ण होतील, त्यानंतर आयुक्तालय स्तरावर एक मुख्य बैठक घेऊन गणेश उत्सव, दहीहंडी उत्सव आणि मोहरमच्या कालावधीत शहरात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत निर्देश दिले जाणार आहेत. शहरातील सर्व गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे मंडळांची नोंदणी करणे आवश्यक आहे. धर्मादाय आयुक्त आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-या मंडळांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असेही रानडे म्हणाले.

गणेशोत्सव मंडळांसाठी पोलीस आयुक्तालयाच्या सूचना –

# गणेश उत्सवाचे मंडप न्यायालयाच्या नियमानुसार असायला हवे
# मंडपासाठी रस्ता रुंदीच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त जागा वापरू नये
# रस्त्यावरील वाहतुकीच्या दिशेनेच मंडपाचे प्रवेशद्वार असावे
# सिग्नल आणि चौकाच्या 100 फूट अंतरामध्ये कोणताही मंडप उभारू नये
# ध्वनी प्रदूषणाचे कसोशीने पालन करावे
# मंडळांची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंद करावी, ज्यामुळे पोलिसांना सुव्यवस्था राखण्यास मदत होईल
# रस्त्यावर, मंडपाजवळ गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा येणार नाही, याची खबरदारी मंडळांनी घ्यावी
# मंडळांच्या तपासणीसाठी विघ्नहर्ता न्यासची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सुरुवात करणार
# उत्सव काळात नागरिकांना अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.