Pimpri : जुन्या मालमत्तांना एक एप्रिलपासून करवाढ ‘होणारच’, आयुक्तांनी महासभेत केले स्पष्ट

2003 सालच्या एक हजार चौरस फुटाच्या इमारतीला आता पाच हजार बील  येणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 2007 पूर्वीच्या जुन्या मालमत्तांच्या करात अडीच ते तीनपटीने वाढ होणार आहे. करयोग्यमूल्य पद्धतीत बदल केले आहेत. त्यानुसार आर्थिक वर्षांपासून म्हणजेच एक एप्रिल 2020 पासून नवीन करवाढ लागू होणार आहे. 2003 सालच्या एक हजार चौरस फुटाच्या इमारतीला 1771 बील येते होते. आता त्या इमारतीला पाच हजार रुपये बील येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महासभेत उदाहरणासह स्पष्ट केले. तसेच 2020-21 हे प्रमाण वर्ष लागू असणार आहे. पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नसून 1 एप्रिलपासून करवाढ लागू होणार आहे.  जुन्या इमारतींना घसारा लागू होईल. दरम्यान, मालमत्ताकर वाढीचा फटका 2 लाख 54 करदात्यांना फटका बसणार आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार करांचे दर 20 फेब्रुवारी 2020 रोजी किंवा तत्पूर्वी निश्चित करणे बंधनकारक आहे. परंतु, सत्ताधारी भाजपने फेब्रुवारी महिन्याची महासभा 26 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली होती. त्यामुळे आयुक्तांचा प्रस्तावाची आपसूकच अंमलबजावणी झाली आहे. फेब्रुवारीची तहकूब सभा आज (बुधवारी) पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभेच्या सुरुवातीलाच नगरसचिव उल्हास जगताप यांनी करवाढीवर 15 फेब्रुवारीपर्यंत चर्चा पूर्ण करणे आवश्यक आहे. तर, 20 फेब्रूवारीपर्यंत कराचे दर निश्चित करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर नगरसेवकांच्या मागणीनुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खुलासा केला. आयुक्त म्हणाले, कर आकारणी झालेल्या जुन्या मिळकती व नवीन मिळकती यांच्या करामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. ही तफावत दूर केली जाणार आहे. कर आकारणीत सुसूत्रता, पारदर्शकता येण्यासाठी इमारतीचा वापर आणि बांधकाम दर्जा विचारात घेऊन प्रति चौरस फुटानुसार करयोग्य मूल्य निश्चित करण्यात आले आहे. 20 फेब्रुवारीपूर्वी दर निश्चित करणे आवश्यक होते. करयोग्य की भांडवली मूल्य पद्धत कोणती पद्धत अवलंबयाची याचा निर्णय महासभेने 20 फेब्रुवारी रोजी घेणे अपेक्षित होते. मात्र, सभागृहाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे करयोग्य मूल्य पद्धत लागू करण्यात येईल.

सन 2020-2021 हे प्रमाण वर्ष घेण्यात आले आहे. सध्याचे त्या-त्या विभागातील  प्रती चौरस फूट दर प्रत्येक वर्षातील मिळकतींना लागू करण्यात येणार आहे. पूर्वलक्षी प्रभावाने करवाढ लागू नसणार आहे. सध्याचे दर जुन्या मिळकतींना लागू करताना राज्य सरकारच्या रेडी रेकनरमधील मिळकतींचे घसारा काढण्यासाठी वापरण्यात येणारी टक्केवारी विचारात घेण्यात येणार आहे. इमारतीच्या वयोमानानुसार घसारा देऊन आलेल्या दराने मिळकतीचे करयोग्य मूल्य निश्चित करण्यात येणार आहे. 0 ते 2 वर्षाच्या इमारतीला 0 टक्के घसारा, 3 ते 5 वर्षाच्या इमारतीला 5 टक्के, 21 ते 30 वर्षापर्यंतच्या इमारतीला 30 टक्के घसारा लागू होईल. 30 टक्क्यांपर्यंत घसारा लागू केला जाईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महासभेने 20 फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला नसल्याने करवाढ लागू होणारच असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपच्या मुकसंमतीने करवाढ झाली आहे. सत्ताधारी भाजपने आयुक्तांच्या माध्यमातून गोरगरिबांचा खिसा कापला आहे. चातुर्याने करवाढ लागू केली आहे. पिंपरी-चिंचवडकरांवर करवाढ लादण्यासाठीचे भाजपने 20 फेब्रुवारीची सभा तहकूब केल्याचा आरोप राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. तर, करवाढीला आमचा विरोध आहे. करवाढ मागे घेता येईल. त्यासाठी वेळप्रसंगी आम्ही न्यायालयात धाव घेऊ असे भाजप नगरसेवकांनी सांगितले.  एकनाथ पवार, दत्ता साने, योगेश बहल, अजित गव्हाणे, संदीप वाघेरे, सचिन भोसले, मीनल यादव, शत्रुघ्न काटे, सीमा सावळे, झामाबाई बारणे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.