Talegaon News : पोलीस आयुक्तांनी सायकलवरून घेतला विकेंड लॉकडाऊनचा आढावा

मध्यरात्री पोलीस आयुक्त आल्याने पोलिसांची धावपळ

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्तालय हद्दीत विकेंड लॉकडाऊनचा आढावा घेतला. पोलीस वर्दीऐवजी ट्रॅकसूट मध्ये मध्यरात्री चक्क सायकलवरून आलेल्या पोलीस आयुक्तांना पाहून पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्तीवर असलेल्या ग्राम सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांशी चर्चा करून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

_MPC_DIR_MPU_II

राज्य शासनाने राज्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हा विकेंड लॉकडाऊन शुक्रवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी आठ या वेळेत असणार आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्या आस्थापना सुरु राहणार असून उर्वरित सर्व जनजीवन ठप्प आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट नाकाबंदी करण्यात आली.

शनिवारी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश त्यांच्या अनोख्या अंदाजात सायकलवरून गस्तीसाठी निघाले. त्यांनी तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भेट दिली. तसेच तळेगाव शहर परिसरात गस्तीवर असलेल्या पोलीस आणि ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांसोबत त्यांनी चर्चा केली. त्यांना मार्गदर्शन करून आयुक्त सायकलवरून चाकणच्या दिशेने रवाना झाले.

आयर्नमॅन म्हणून ओळख असलेल्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या स्पोर्टी अंदाजाची वेळोवेळी चर्चा होते. खेळाला आणि शारीरिक फिटनेसला आयुक्तांची प्राथमिकता असते. त्यातच ते अचानक, अनपेक्षितपणे पोलीस स्टेशन आणि परिसरात भेटी देत असल्याने पोलीस देखील कायम अलर्ट असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.