Chinchwad News : नदी की नाला? स्मार्ट सिटीत पवना नदीची अवस्था दयनीय

एमपीसी न्यूज – आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिकांंमध्ये गणल्या जाणाऱ्या पिंपरी – चिंचवड शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. उद्योग आणि आयटी क्षेत्राची मोठी रेलचेल असलेल्या या शहराची उद्योगनगरी अशीही ओळख आहे. शहारात पायाभूत सुविधांसाठी पालिका मोठा खर्च करते, पण एवढ्या चकचकीत शहराच्या मध्यातून जाणा-या पवना नदीची अवस्था दयनीय आहे. खरंच ही नदी आहे का नाला ? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

पवना धरण ते दापोडी, उगम ते संगम असा पवना नदीचा प्रवास आहे. पवना नदीची स्वच्छता आणि हाती घेतलेले विविध उपक्रम याचा लेखाजोखा घेतला तर बाकी शून्य उरते अशी काहीशी परिस्थिती आहे. नदीतील जलपर्णी हा चगळून, चगळून कथ्याकूट झालेला विषय आहे. अनेक निविदा आणि लाखो रूपये खर्च करून परिस्थिती जैसे थे आहे. सध्या नदीतील जलपर्णी काढण्याचे काम जोरात सुरू आहे. पण, जलपर्णी होऊच नये म्हणून उपाययोजना होताना दिसत नाहीत. नदीचे पाणी बघून हे खरच पाणी आहे का प्रदुषित नाल्याचा प्रवाह आहे? असा प्रश्न पडतो.

एवढ्या प्रमाणावर दुषित झालेल्या पाण्यामुळे नदीपरिसरात दुर्गंधी पसरली आहे. अशा दुषित पाण्यात जलचर तरी कसे जिवंत राहणार ही देखील एक शंकाच आहे. चिंचवड घाट, श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांचे समाधीस्थळ तसेच, धनेश्वर मंदीरामुळे प्रसिद्ध आहे. पण, नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नदीचे प्रदुषण होत असल्याचे दिसून येते. नदीत कचरा टाकू नये यासाठी संरक्षक जाळी लावली असताना देखील नागरिक सर्सास नदी शेजारी कचरा टाकत आहेत. जुना जकात नाका तसेच धनेश्वर मंदीरजवळील पुलाशेजारी सांडपाण्याचा प्रवाह थेट नदीत सोडला आहे, त्यामुळे पाणी दुषित होत आहे.

घाट परिसरात नदीच्या चौफेर मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य दिसून येते. दैनंदिन कचरा, शिळे व शिल्लक अन्न, अनेक टाकाऊ वस्तू, प्लॅस्टिक बॉटल्स व पिशव्या, दारूच्या बाटल्या, कुजलेली फुले यासारखा विविध कचरा याठिकाणी टाकण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर देवाच्या मूर्त्या, कॉपी, फाटलेले फोटो आणि दुरावस्था झालेली मूर्तीचे तुकडे देखील टाकण्यात आले आहेत. जुना जकात नाका येथील पुलाखाली नदी पात्रात काही ठिकाणी गाळ साचला आहे तर, काही ठिकाणी खडक उघडा पडला आहे. यामुळे नदी प्रवाह एकाच बाजूने पुढे जात आहे. याठिकाणी नदी मृत झाल्याचे तज्ञ मंडळी सांगतात.

पहिली – दुसरीत शिकवले होते नदी स्वच्छतेचे महत्व !

निसर्गासह परिसर व नदी स्वच्छतेचे महत्व आपल्याला पहिली – दुसरीत शिकवले जाते. पण त्याचा विसर नागरिकांना पडल्याचे दिसते. पिंपरी चिंचवड शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत मोठे बदल शहरात होऊ घातले आहेत. स्मार्ट रस्ते, डिजिटल क्रांती, स्मार्ट शाळा, मेट्रो अशा अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. आता स्मार्ट शहरातील नागरिकांनी देखील स्मार्ट होण्याची गरज असून, नदी स्वच्छतेला गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.