Pimpri News: राष्ट्र बळकट करण्यासाठी संविधानाचा हा जागर महत्वपूर्ण – प्रा. सुभाष वारे

एमपीसी न्यूज – संविधान संवाद अभियानाद्वारे अभियानाद्वारे भारतीय संविधानाची जनजागृती करणे हा अतिशय आगळावेगळा उपक्रम ठरला असून संविधान समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे अभियान महत्त्वपूर्ण ठरत आहे. या अभियानाला शहरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळाला. राष्ट्र बळकट करण्यासाठी संविधानाचा हा जागर महत्वपूर्ण ठरला असून संविधानाच्या जनजागृतीसाठी सर्वांनी निरंतर सामुहिक प्रयत्न करीत राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. सुभाष वारे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 26 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत शहरात “संविधान संवाद अभियान” उपक्रम राबविण्यात आला होता. 30 नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात या अभियानाचा समारोप कार्यक्रम पार पडला. अभियानात सहभाग घेऊन प्रचार प्रसाराचे कार्य करणा-या विविध संस्था आणि व्यक्तींचा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांना प्रा. वारे यांनी मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्यासह बानाईचे विजय कांबळे, चंद्रकांत पाटील, रयत विद्यार्थी विचार मंचचे धम्मराज साळवे, संतोष शिंदे, भाग्यश्री आखाडे, लोकराजा शाहू संवाद प्रशिक्षण केंद्राचे सुनील स्वामी, राजवैभव शोभा रामचंद्र, रेश्मा खाडे यांच्यासह विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pimpri News: ‘जॅकवेल’च्या कामात भ्रष्टाचार किंवा भाजपा नेत्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध करा – एकनाथ पवार

प्रा. सुभाष वारे म्हणाले, संविधान प्रसाराच्या उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. संविधान आणि आपल्या आजूबाजूला घडणा-या घटनांकडे बघण्याचा प्रत्येकाचा संविधानिक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या मनात संविधानाबद्दल असलेला आदर आणि निष्ठा वाढीस लावून सार्वभौम संविधानाच्या जनजागृतीसाठी संविधान संवादक पथक काम करीत होते या सदस्यांनी समर्पित भावनेने आणि सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांचा आधार घेत हा प्रचार केला. त्यातून समाजातील सर्व घटकांपर्यंत संविधानाचा मुल्याशय पोहोचविण्यास मदत झाली, असे प्रा. वारे म्हणाले. संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यातूनच समाज सुधारक आणि महापुरुषांना अपेक्षित असलेले राष्ट्र निर्माण होईल. तसेच सर्वांना समान हक्क अधिकार प्राप्त होऊन विकासाची संधी देखील त्यातून निर्माण होईल. यासाठी आधी हे संविधान आपण स्वतः समजून घेऊन ते इतरांना समजावून सांगण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मानव कांबळे म्हणाले, महापालिकेने स्तुत्य उपक्रम राबवून संविधान प्रचार प्रसाराचे काम केले आहे ही आनंदाची बाब असून नागरिकांनीही अशा चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी उत्स्फुर्तपणे पुढे आले पाहिजे.

शहरातील नागरिकांचा या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था तसेच विविध मंडळे सहभागी झाले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या अभियानाच्या माध्यमातून संविधानाला अपेक्षित नागरिक घडवण्यासाठी संविधान मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यात येत आहे. या अभियानामुळे संविधानाचा आशय आणि मुल्ये समजण्यास आम्हाला मदत झाली. तसेच स्वतःच्या हक्क आणि कर्तव्याप्रती जागरुक राहण्याची प्रेरणा आम्हाला या अभियानाच्या माध्यमातून मिळाली, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

देशाच्या वाटचालीत संविधानाचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे या भारतीय संविधानाच्या मुल्याशय तसेच संविधानिक दृष्टीकोन इथल्या जनमानसात रुजणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी दशेपासूनच हा दृष्टीकोन अवगत झाला तर प्रत्येक विद्यार्थी भारतीय संविधान समजून घेईल, त्यातील मूल्ये जीवनाचा भाग बनवतील, असा विश्वास या संविधान संवाद अभियानातून व्यक्त होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कांबळे यांनी केले तर आभार संतोष शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.