Pimpri: पालिका कोविड केअर सेंटर सेवाभावी, खासगी संस्थांना चालविण्यास देणार

The corporation will allow Covid Care Center to be run by charitable private organizations

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपाययोजना करताना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. मनुष्यबळाची कमतरता, कोरोनाची लांबची लढाई विचारात घेत पालिकेने कोविड केअर सेंटर (सीसीसी) चालविण्यासाठी खासगी संस्थांना निमंत्रित केले आहे. त्यासाठी  ‘ए’, ‘बी’, ‘सी’ अशा तीन विभागात वर्गवारी केली आहे.  त्यानुसार सेवाभावी संस्था, अशासकीय संस्था, खासगी रुग्णालये, संघटना वैद्यकीय संस्था यांच्याकडून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रस्ताव मागविले आहेत. यामुळे कोविड केअर सेंटरची संख्याही वाढणार आहे.

शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्या साडेसहा हजार पार झाली आहे. सध्या सक्रिय रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी नवीन रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. जुलैअखेर रुग्णसंख्या 10 हजार पार होण्याचा अंदाज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वर्तविला आहे. पावसाळ्यात रुग्णवाढ होण्याचीही शक्यता आहे. साथीचे आजारही डोके वर काढू शकतात. महापालिकेने अकरा कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत.

महापालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. नवीन कोविड केअर सेंटर सुरु केल्यास पालिकेचे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे लागते. त्यामुळे रुग्णालयात मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यासाठी पालिकेने कोविड सेंटरचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सेंटर चालविण्यासाठी सेवाभावी संस्था, अशासकीय संस्था, खासगी रुग्णालये, संघटना वैद्यकीय संस्था यांच्याकडून  प्रस्ताव मागविले आहेत. कोविड सेंटरमध्ये कोरोना पॉझिटीव्ह पण लक्षणे काहीच नाहीत. सौम्य लक्षणे आहेत असा रुग्णांवर उपचार केले जातात.

पालिकेने ‘ए’, ‘बी’, ‘सी’ अशा तीन विभागात वर्गवारी केली आहे.  त्यानुसार खासगी संस्थांकडून दर मागविले आहेत. ‘ए’ विभागासाठी  रुग्णवाहिका, लॅब सर्विस व बायोमेडिकल वेस्ट अर्थात जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन सुविधा महापालिका पुरविणार आहे. सेंटर चालकांनी इमारत, अन्य पायाभूत सुविधा, पीपीई कीट, ग्लोज, ऑक्सीमीटर, थर्मोमीटर, एन 95 व अन्य मास्क, शस्त्रक्रिया साहित्य, सानिटायझर, संगणक अशा सर्व सुविधा स्वत: उपलब्ध करून द्यायच्या आहेत.

‘सी’ विभागासाठीही या सुविधा संबंधित संस्थांनी उपलब्ध करायच्या आहेत. त्यांना फक्त लॅब सर्विस, बायोमेडिकल वेस्ट, टेलिफोन, वीज, पाणी, इंटरनेट, स्टेशनरी, मेडिसीन महापालिका पुरविणार आहे. मात्र, ‘बी’ विभागातील सेंटर साठी सर्व सुविधा महापालिका पुरविणार असून संबंधित संस्थांनी केवळ मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायचे आहे.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या 21 कोविड केअर सेंटरसाठी 21 मॅनेजर, 45 कन्सल्टंट, 318 डॉक्टर, 21 नर्सिंग इन्चार्ज, 350 स्टाफ नर्स, 21 फार्मासिस्ट, 330 वॉर्ड बॉय किंवा आया, 402 सफाई कामगार, 30 संगणक किंवा डाटा एन्ट्री ऑपरेटर व 21 स्टोअर मॅनेजर असे 1599 अधिकारी, कर्मचारी मिळून मनुष्यबळ आवश्यक आहे. संबंधित संस्थांनी ते उपलब्ध करून द्यायचे आहे.

याबाबत बोलताना पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”महापालिकेचे 11 कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. पालिकेकडे मनुष्यबळ कमी आहे. नवीन मनुष्यबळ मिळत नाही. सेंटर चालविण्यासाठी रुग्णालयातून मनुष्यबळ दिले जाते. त्यामुळे रुग्णालयात कर्मचारीच राहीले नाहीत. बाकीचे काम थांबत आहे. सीसीसी सेंटर खासगी संस्थांना चालविण्यास दिल्यास मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यामुळे सेंटरचे विकेंद्रीकरण केले जाणार आहे. त्याचे तीन विभाग केले आहेत”.

”पहिल्या विभागात पालिका चालवित असलेल्या 11 सेंटरमध्ये साहित्य पालिकेचे राहील. खासगी संस्थेने डॉक्टर, नर्सह मनुष्यबळ पुरवायचे आहे. त्यानुसार एका बेडला दिवसाला किती दर आकारला जाईल  याची माहिती संस्थाकडून मागविली आहे. तर, दुस-या पर्यायात पालिका मोकळी इमारत देईल. खासगी संस्थेने बेडसह सर्व साहित्य आणायचे आणि रुग्णांच्या जेवणासह सेंटर चालवायचे. पालिका फक्त वीज, पाणी आणि फोनची सुविधा पुरविणार आहे”.

”तिस-या पर्यायात पालिका काहीच देणार नाही. इमारत, साहित्य, कर्मचारी संस्थेचेच राहतील. त्याचा दर मागविला आहे. 100 ते 700 बेडपर्यंतचा दर मागविला आहे. दिघीत एक हजार बेडचे, अण्णासाहेब मगर स्टेडीयममध्ये दोन हजारचे सीसीसी सेंटर उभारण्याचे नियोजन आहे”, असेही त्यांनी सांगितले.

सद्यस्थितीत कार्यरत असलेले कोविड केअर सेंटर!

  • पिंपरी-चिंचवड कॉलेज आफ इंजिनिअरींग, आकुर्डी
  • रिजनल टेलिकॉम सेंटर, शाहुनगर
  • किवळेतील सिम्बॉयोसिस कॉलेज
  • डी. वाय. पाटील मुलींचे हॉस्टेल आकुर्डी
  • डी. वाय. पाटील आयुर्वेदीक कॉलेज, संत तुकारामनगर, पिंपरी
  • मोशीतील आदीवासी विभाग मुलांचे व मुलींचे हॉस्टेल
  • बालाजी युनिव्हर्सिटी, लॉ कॉलेज
  • ताथवडेतील इंदिरा कॉलेज
  • बालेवाडी हॉस्टेल
  • मोशीतील सामाजिक न्याय विभागाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह
  • म्हाडा वसाहत, म्हाळूंगे, चाकण

सद्यस्थितीत पालिकेचे हे 11 कोविड केअर सेंटर चालू आहेत. हे सेंटर देखील खासगी संस्थांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.