Sarasbagh Chowpatty : पालिका सारसबाग चौपाटी येथे विकसित करणार वॉकींग प्लाझा

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या वतीने सारसबाग चौपाटी (Sarasbagh Chowpatty) येथे वॉकींग प्लाझा विकसित करण्यात येणार असून येथील खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांना अटी-शर्तींवर व्यवसायासास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच तुळशीबागेतील पथारी व्यावसायिकांकडून थकबाकी लवकरात लवकर भरण्याचे हमीपत्र घेऊन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, बिबवेवाडी येथील सील केलेले बांधीव गाळे नियमान्वीत करण्याचा विचार असून गाळे धारकांना थकबाकी भरल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आज घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.

महापालिकेच्यावतीने मागील काही दिवसांपासून पथारी व्यावसायिक, स्टॉल धारकांकडून थकबाकी वसुलीसाठी तसेच अतिक्रमण केल्या विरोधात व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सारसबाग चौपाटीवरील खाद्य पदार्थांचे सर्व स्टॉल सील करण्यात आले असून या स्टॉल्सच्या समोर रस्त्यावरच उभारण्यात आलेले शेडस्, टेबल, खुर्च्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Income tax : महापालिकेमध्ये समाविष्ट 23 गावांना मिळकत कर लागू करण्यास मंजुरी

याठिकाणी व्यावसायिकांकडून (Sarasbagh Chowpatty) सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाने ही कारवाई केल्यानंतर मागील दोन आठवड्यांपासून येथील सर्व व्यवसाय बंद आहेत. या पाठोपाठ मागील आठवड्यात तुळशीबागेतील परवानाशुल्काची थकबाकी असलेल्या दोनशेहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांचे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. तर नुकतेच तीन दिवसांपुर्वी बिबवेवाडी गावांमध्ये स्वामी विवेकानंद रस्त्यावरील स्टॉल्सचे बेकायदेशीर रित्या गाळ्यांमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी येथील 51 गाळे सील करण्यात आले आहेत. हे गाळे बांधल्यानंतर महापालिकेने चार वर्षांपासून त्यांचे भाडेच जमा करणे बंद ठेवले होेते.

दरम्यान, या सर्व व्यावसायिकांचे हातावर पोट आहे. कोरोनामुळे दोन वर्षे व्यवसाय बंद असल्याने थकबाकी राहील्याचेही पथारी व्यावसायिक संघटना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेउन निदर्शनास आणून दिले होते. यावर आज आयुक्तांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये सारसबाग चौपाटी येथे अतिक्रमण होऊ नये, तसेच पर्यटकांसाठी वॉकींग प्लाझा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

येथील व्यावसायिकांनी टेबल, खुर्च्या मांडू नयेत, तसेच शेडस् उभारू नयेत, तसेच नियमांचे उल्लंघन करू नये या अटींवरच व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबधित व्यावसायिकाचा परवाना रद्द करण्याचेही यावेळी निश्‍चित करण्यात आले.

बिबवेवाडी येथील स्टॉल्सचे (Sarasbagh Chowpatty) गाळ्यांमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी झालेल्या चौकशी अहवालावर देखील यावेळी चर्चा झाली. हे गाळे नियमान्वीत करता येतील याबाबत प्रशासन माहिती घेईल. नियमान्वीत करता येऊ शकणारे गाळे निश्‍चितपणे नियमान्वीत करण्यात येतील, बेकायेदशीर ठरणार्‍या गाळ्यांवर कारवाई करायची. तोपर्यंत थकबाकी भरून घेउन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.