Pune News : पालिका घेणार टाटा निक्सॉन कंपनीच्या पर्यावरणपूरक 38 ई मोटारी भाडेतत्वावर

एमपीसी न्यूज : पेट्रोल, डिझेल दरवाढीची झळ आता महापालिकेलाही बसत आहे. याच कारणामुळे महापालिकेने पदाधिकारी व अधिकार्‍यांसाठी 38 ई-वाहने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिकेची दरमहा 1 लाख 77 हजार रुपयांची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. कडे महापालिकेने ई भाडेतत्वावर वाहने पुरविण्यासाठी विचारणा केली होती. त्यानुसार मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. ने महापालिकेला टाटा नेक्सॉन कंपनीच्या ई मोटारी चालकासह 8 वर्षे भाडेतत्वावर देण्याचे दरपत्रक दिले.

8 वर्षांनंतर करार संपल्यानंतर मोटारीच्या एमआरपीच्या 5 टक्के रक्कम भरल्यास त्या मोटारी महापालिकेलाच मालकीहक्काने देण्याचेही कंपनीच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. 38 वाहनांसाठी चालकासह 23 कोटी 28 लाख 88 हजार रुपये खर्च येणार असून तो 8 वर्षे टप्प्याटप्प्याने द्यायचा आहे.

पेट्रोल व डिझेलवरील वाहनासाठी प्रत्येक महिन्याला 63 हजार रुपये खर्च येत असून टाटा नेक्सॉन ई वाहनांसाठी 58 हजार 350 रुपये खर्च होणार आहे. प्रत्येक गाडीमागे सरासरी 4 हजार 655 रुपये बचत होणार असून 38 वाहनांसाठी दरमहा 1 लाख 77 हजार रुपये बचत होण्याबरोबरच पर्यावरणाची हानी कमी होण्यासही मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.