Pune : मेट्रो प्रकल्पाचा खर्च १० टक्क्यांनी कमी 

एमपीसी न्यूज – नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना प्रत्यक्ष हा खर्च दहा टक्क्यांनी कमी म्हणजे सात हजार पाचशे कोटी रुपये इतका होणार आहे. पुणे मेट्रोचा खर्च देखील सुमारे दहा टक्क्यांनी कमी होऊ शकतो, अशी माहिती दीक्षित यांनी दिली. 

चार वर्षांत नागपूर मेट्रोचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून तीन वर्षात नागपूर मेट्रोचे ट्रायल रन घेण्यात आली. मात्र, पुण्यात ३ वर्षात प्रत्यक्षात मेट्रोची सेवा सुरु होईल. नागपूर मेट्रोचा अनुभव पुणे मेट्रोच्या कामी येत असून यामुळे नागपूर पेक्षा जास्त वेगात पुणे मेट्रोचे काम पूर्ण होत आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

शहरात 26 जानेवारीला पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी आणि वनज ते गरवारे महाविद्यालय मार्गाचे उद्घाटन होणार आहे. पुण्यातील दोन मेट्रो मार्गाचे काम सुमारे पस्तीस टक्के पूर्ण झाले आहे. नागपूरमध्ये आणखी 13 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. एकूण 38 किलोमीटरचे चार मार्ग नागपूरमध्ये होणार असून आणखी 42 किलोमीटरचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर पुण्यात 30 किलोमीटरच्या दोन मार्ग होणार असून पिंपरी-चिंचवड ते निगडी स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे प्रस्ताव तयार आहेत.

दरम्यान, मंडईचे भूमिगत स्थानक बनवताना त्यामध्ये मंडईचा इतिहास आणि मंडईच्या इमारतीची प्रतिकृतीचा समावेश स्थानकात करण्यात येणार असून त्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.