Bijali Nagar News : भुयारी मार्गाचा खर्च वाढता वाढे!

साडेचार कोटींच्या वाढीव खर्चाला 'स्थायी'ची विनाचर्चा मान्यता

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत बिजलीनगरकडून गुरूद्वाराकडे जाणा-या रस्त्यावर भुयारीमार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, विद्युत वाहिनी, विद्युत जनित्र, जल:निसारण नलिका, पाणीपुरवठा नलिकांच्या अडथळ्यांमुळे अर्धवट स्थितीत असलेल्या या कामावर आतापर्यंत तब्बल साडेचार कोटीचा वाढीव खर्च झाला आहे. स्थायी समितीने या वाढीव खर्चास विनाचर्चा आयत्यावेळी मान्यता दिली.

पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) ते बिजलीनगर, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी आणि रेलविहार सोसायटी या परिसराकडे येण्यासाठी आणि वाहतुक सुरळीत होण्यासाठी रेल्वे मार्गावर  स्पाईन रस्त्यावर पुल बांधण्यात आला होता. हा पुल ओलांडून वाल्हेकरवाडीकडे जाण्यासाठी तसेच डावीकडे, उजवीकडे बिजलीनगर आणि गुरूद्वाराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने वारंवार वाहतुक कोंडी आणि अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. हा चौकाचा भाग दोन्ही बाजूंच्या रस्त्यांपेक्षा उंच आहे. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यासाठी योग्य अशी भौगोलिक परिस्थिती होती. या ठिकाणचा हा अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेमार्फत बिजलीनगर कडून गुरूद्वाराकडे जाणा-या रस्त्यावर भुयारीमार्ग करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.

याठिकाणी व्हेईक्युलर भुयारी मार्ग बांधण्याच्या कामाचे अंदाजपत्रक करण्यास एनआयसीईपीएल यांना सांगण्यात आले. त्याप्रमाणे सुरूवातीला सर्व बाबी गृहित धरून 20 कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. तथापि, मुळ प्रशासकीय मान्यता 15 कोटी असल्याने अंदाजपत्रक मान्य करताना 14 कोटी 25 हजार रूपये इतक्या रकमेला मान्यता देऊन निविदा मागविण्यात आल्या. लघुत्तम निविदाकार कृष्णाई इन्फ्रा यांना 3 मार्च 2018 रोजीच्या निर्णयानुसार कामाचे आदेश देण्यात आले.

त्यानंतर या रस्त्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणानुसार, झोपडपट्टी अतिक्रमण, वृक्ष, भुमिगत विद्युत वाहिनी, विद्युत जनित्र, बस थांबा, जल:निसारण नलिका, पाणीपुरवठा नलिका या बाबी रस्त्यात अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आले. हे अडथळे दूर करणे आवश्यक होते. या अडचणी लक्षात घेऊन या ठिकाणी वाहतुक सुरळीत राहण्यासाठी योग्य पद्धतीने निरीक्षण करून वाहतुक आराखडा तयार करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

रस्त्यातील भुमिगत विद्युत वाहिनी, फिडर बॉक्स, विद्युत जनित्र स्थानांतर करण्यासाठी 49 लाख 38  हजार रूपये इतका जादा खर्च झाला आहे. जल:निसारण कामावर 24 लाख 61 हजार रूपये वाढीव खर्च झाला आहे.

 या दोन्ही कामासाठी लागणारा वाढीव खर्च मुळ निविदेतूनच करण्यात आला आहे. हा 74 लाखाचा खर्च स्थापत्य विभागाच्या मुळ निविदेतून कमी होणार आहे. जलवाहिनी आणि विद्युत केबलचे खोदकाम वेगेवगळ्या वेळी झाले आहे. त्यामुळे काम करून रस्ता सुरळीत ठेवण्यासाठी डांबरिकरणाचा खर्च वाढला आहे. सुधारीत स्ट्रक्चरल ड्रॉर्इंग आणि डिझाईननुसार झालेल्या बदलामुळे कठीण खडकात खोदल्यामुळे खर्चात 32 लाखाची वाढ झाली. भुयारी मार्गाच्या भिंतींना लागणा-या टाईल्समध्येही बदल केल्याने खर्चात 66 लाखाची वाढ झाली आहे.

महापालिका सभेतील 26 ऑगस्ट 2020 रोजीच्या ठरावानुसार या कामाच्या अंदाजपत्रकीय रकमेत 5 कोटीची वाढ करून सुधारीत 20 कोटीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तथापि, हा ठराव सदस्य प्रस्ताव असल्याने अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्तांची मान्यता आवश्यक आहे.

या कामास आयुक्तांनी 2 मार्च 2021  पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. या कामासाठी सन 2021 च्या अंदापत्रकात 7 कोटीची तरतुद करण्यात आली होती. त्यापैकी 5 कोटी 71 लाख रूपये इतकी रक्कम शिल्लक आहे. उर्वरीत वाढीव रकमेची तरतुद सन 2020-21 च्या सुधारीत अंदाजपत्रकात आणि सन 2021-22  च्या मुळ अंदाजपत्रकात करण्यात येत आहे. त्यामुळे भुयारी मार्गाच्या या कामाचा वाढीव खर्च 4 कोटी 66 लाख रूपये आणि एकूण खर्च 18 कोटी 66 लाख रूपये इतक्या सुधारीत खर्चास स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.