Corona Vaccination : दुसरा डोस दोन महिन्यांनी घेतल्यास कोविशिल्ड ही लस ९० टक्के प्रभावी

एमपीसी न्यूज : कोविड-१९ साथीचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर भारतातील काही राज्यांतील स्थिती चिंताजनक होत असताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी महत्त्वपूर्ण माहिती देऊन मोठा दिलासा दिला आहे. दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने लस दिल्यास कोविशिल्ड ही लस ९० टक्के प्रभावी असल्याचे चाचणीअंती आढळून आले आहे, असे त्यांनी सांगितले.

कोविशिल्ड लसीच्या प्रभाव क्षमतेबाबत दोन समूहांवर करण्यात आलेल्या चाचणीच्या निष्कर्षात एका महिन्याच्या अंतराने एका समूहाला ही लस देण्यात आली असता ही लस ६० ते ७० टक्के प्रभावी असल्याचे आढळले. दुसऱ्या समूहाला दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने देण्यात आली असता लस ९० टक्के प्रभावी आढळली. कोविशिल्ड लसीची एक मात्रा देण्यात आलेल्या पन्नास वर्षांखालील लोकांमध्ये लसीचा उत्तम प्रतिसाद दिसून आला.

 

लसीच्या एका मात्रेने ७० टक्के लोक पूर्णत: सुरक्षित होतात; परंतु दुसरी मात्रा दीर्घकाळासाठी प्रतिकार क्षमता प्राप्त व्हावी म्हणून घेणे आवश्यक आहे.डोसमध्ये जास्त अंतर ठेवल्यास इतर लसीही चांगल्या प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. मागच्या महिन्यात लसीकरणावरील तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशीनुसार सरकारने लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविले आहे. इतर देशांत पहिल्या डोसनंतर सहा आठवड्यांनी दुसरा डोस दिल्यास लसीची क्षमता वाढल्याचे चाचणीअंती आढळल्याने या समितीने दोन डोसमधील अंतर वाढविण्याची शिफारस केली होती.

अदर पूनावाला यांनी सांगितले की, लसीच्या पहिल्या डोसनंतर प्रतिकार क्षमता वाढणे सुरू होते. पहिला डोस घेतलेल्या पन्नास वर्षांखाली लोकांतही लसीचा उत्तम प्रतिसाद आढळून आला. कोविड-१९ च्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत मिळणारे संरक्षणही चांगले आहे. एका डोसनंतर ७० टक्के लोकांनाही या संसर्गापासून पूर्णत: सुरक्षित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.