India Corona Update : तिसऱ्या लाटेचं संकट ! सात महिन्यानंतर एक लाखांहून अधिक रुग्ण, तीन हजारांवर ओमायक्रॉन बाधित 

एमपीसी न्यूज – भारतावर तिसऱ्या कोरोना लाटेचं संकट घोंघावत आहे. तब्बल सात महिन्यानंतर देशात एक लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, ओमायक्रॉन बाधितांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 17 हजार 100 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढून 7.74 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 52 लाख 26 हजार 386 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 43 लाख 71 हजार 845 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 30 हजार 836 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 97.57 टक्के एवढा झाला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 3 लाख 71 हजार 363 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 302 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 83 हजार 178 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.38 टक्के एवढा झाला आहे. लसीकरणात देश आघाडीवर असून आजवर 149.66 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

देशात गेल्या 24 तासांत 377 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 3,007 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यापैकी 1,199 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या 1,808 ॲक्टिव्ह ओमायक्रॉन बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.