Dasara Special : सद्यस्थितीतील दसरा सण….

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील, समाज जीवनातली नकारात्मकता दूर करून ,आनंद चैतन्य निर्माण करणारा दसरा

एमपीसी न्यूज ( श्रीकांत चौगुले) : अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात. या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून या तिथीला विजयादशमी असेही म्हणतात .दसरा हा सण संपूर्ण भारतात सर्वत्र साजरा करतात .भारतीय परंपरेनुसार वर्षात साडेतीन मुहूर्त महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी दसऱ्याचा एक दिवस आहे .या दिवशी अनेक शुभकार्यांचा शुभारंभ केला जातो. अशा सर्व कारणांमुळे” दसरा सण मोठा. नाही आनंदा तोटा “अशी म्हण रूढ झाली आहे.

भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या आनंदात साजरे करतात. अनेक सणांचे सार्वजनिक स्वरूप समाजात चैतन्याचे वातावरण निर्माण करते, पण मार्च महिन्यापासून कोरोणामुळे समाज जीवन ठप्प झाले होते. याकाळात अनेक सण आले गेले पण त्याची चाहूलही सार्वजनिक जीवनात दिसली नाही. आता मात्र हळूहळू समाजजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. लॉकडाउन काळात घातलेली बंधने शिथिल होत आहेत.
दसऱ्याच्या काळात देवीच्या मंदिरात गर्दी असते.

अनेक ठिकाणी नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. सध्या मंदिरे बंद असल्याने व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असल्याने, नवरात्रोत्सवातील तरुणाईचा आवडता दांडिया रास गरबा याची रंगत दिसली नाही. असे असले तरीही बाजारपेठेतील मरगळ आता दूर होऊ लागली आहे .हळूहळू सार्वजनिक ठिकाणी खुली होऊ लागल्याने, तिथेही गर्दी जाणवू लागली आहे. घरात बसून कंटाळलेली मंडळी आता घराबाहेर पडू लागली आहेत. सुरुवातीला असणारी, समाज मनातील कोरोणाची भीती आता कमी झाली आहे. लोकांनी कोरोणासोबत जगण्याचे आव्हान स्वीकारले आहे .यामुळे सार्वजनिक ठिकाणी , बाजारपेठांमध्ये वर्दळ वाढली आहे .उपलब्ध आकडेवारीनुसार कोरोणाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होत आहेत. समाजजीवन सुरळीत होत आहे. असाच बदल होत गेला तर येणारा दिवाळी सण सर्वांना आनंदात साजरा करता येईल .व्यापारी वर्गापासून सर्वांनाच ते लाभदायी ठरेल.

समाज जीवन हे परिवर्तनशील असते. आजवर अनेक बदल, अनेक आव्हाने मानवाने स्वीकारली आहेत. कोरोणाच्या काळातसुद्धा ऑनलाइन जीवन पद्धतीचा स्वीकार केलेला दिसतो. वस्तू खरेदीपासून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत. तर प्रशिक्षणांपासून देवदर्शनापर्यंत सगळं काही ऑनलाईन झालं. आताही दसऱ्यानिमित्त अनेक देवी-देवतांचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने लोक घेताना दिसतात. मंदिरे बंद असली तरी लोकांनी आपल्या मनातला भक्तिभाव असा जोपासला आहे.

विजयादशमीला राजकीयदृष्ट्या पूर्वीच्याकाळी फार महत्त्व होते. दसऱ्याच्या दिवशी सैन्य मोहिमेवर निघत असे. राज्याच्या सीमा पार करून जात असे. त्यालाच सीमोल्लंघन म्हणतात. सैन्य मोहीमेवर निघण्यापूर्वी शस्त्रास्त्रांची पूजा करत .ती प्रथा आजही आपण पाळतो. विविध यंत्रांची ,अवजारांची पूजा करतो. पूर्वीच्या काळी शत्रूवर विजय मिळवणे हे महत्त्वाचे ठरत असे. आजच्या काळातील संपूर्ण मानव जातीचा शत्रू म्हणजे कोरोणा होय. या कोरोणावर मात करण्यासाठी ,त्याचा संपूर्ण पराभव करण्यासाठी, त्याचा बीमोड करण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे .तरच येणाऱ्या काळातील सण उत्सव आपण बिनधास्तपणे ,आनंदाने साजरे करू शकू.

एमपीसी न्यूज परिवारा तर्फे आपणाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III