Maval News : कोयत्याच्या धाकाने अल्पवयीन मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी पळवली

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या मुलाला थांबवून त्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील एक लाख 40 हजार 900 रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री आठच्या सुमारास मावळ तालुक्यातील सांगवडे येथे घडली.

याप्रकरणी 17 वर्षीय मुलाने सोमवारी (दि. 24) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र हे दोघे फिर्यादीच्या मोपेड दुचाकीवरून सांगवडे रोडने जात होते. ते राक्षे यांच्या वीटभट्टीजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून तीन आरोपी दुचाकीवरून आले. त्यातील एकाने फिर्यादी यांच्या डोक्यात टपली मारून थांबवले. त्यानंतर आरोपींनी त्यांची दुचाकी फिर्यादीच्या दुचाकी समोर उभी केली.

एका आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील एक लाख 40 हजार 900 रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर एका आरोपीने त्याच्या कमरेला लावलेला कोयता दाखवून ‘गप्प बस नाहीतर कोयता डोक्यात घालीन’ असा फिर्यादीला दम दिला. पोलीस हवालदार सुधीर वाडिले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.