Talegaon : कासारसाई बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी

लहुजी शक्ती सेनेचे एकदिवसीय उपोषण

एमपीसी न्यूज – कसारसाई येथे झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक आणि लहुजी शक्ती सेनेचे उपाध्यक्ष सचिन खिलारे यांनी गुरुवारी (दि. 4) एकदिवसीय उपोषण केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी जिल्हाधिका-यांना याबाबत निवेदन दिले. त्यानंतर उपोषण सोडण्यात आले. या उपोषणासाठी युवा उद्योजक संतोष शेळके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष संतोष खिलारे, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी जाहीर पाठिंबा दिला.

कसारसाई जवळ असलेल्या साखर कारखान्यात काम करणा-या लोकांनी दोन 12 वर्षांच्या मुलींवर सामूहिक बलात्कार केला. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी देखील सुनावली. यापुढील तपास पोलीस करत आहेत. परंतु या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अगदी लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत संपूर्ण महिलावर्ग असुरक्षित झाला आहे. लहान मुलींना घराबाहेर खेळायला पाठवायचं का, शाळकरी मुलींना शाळेत पाठवायचं का, महिलांनी कामासाठी बाहेर पडायचं का, वृद्ध महिलांनी घराबाहेरच्या हवेचा मोकळा श्वास घ्यायचा का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. याबाबत येत्या आठवड्यात सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांना भेटून आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.