BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : साबळेवाडी हद्दीतील मृताची ओळख पटेना

पोलिसांचा तपास शून्यावर

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाची ठोस बसून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील साबळेवाडी (ता. खेड, जि.पुणे) गावच्या हद्दीत मृत्यू झालेल्या इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे येथील पोलिसांचा तपास शून्यावरच राहिला आहे. रुग्णवाहिका चालक संतोष दगडू लोणारी (वय – २८ वर्षे, रा. भोसे, ता. खेड,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ नजीक साबळेवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील धोकादायक वळणावर रात्रीच्या वेळी हा अपघात झाला होता. चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे पायी जाणाऱ्या एका ४० ते ४२ वर्षीय इसमास कोणत्यातरी अज्ञात वाहनाची जोराची ठोस बसून संबंधित अनोळखी इसम जागीच ठार झाला होता. त्यानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटना स्थळी न थांबता ताबडतोब वाहनासह घटना स्थळावरून गायब झाल्याने येथील पोलिसांनी संतोष लोणारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, या अपघातात ठार झालेल्या त्या अनोळखी इसमाची अद्याप ओळख पटलेली नसल्याने येथील पोलिसांच्या तपास कार्यात अडथळा आला आहे.

संबंधित इसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे : वय – अंदाजे ४० ते ४२ वर्षे, अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व त्यावर काळ्या रंगाच्या चौकटी पट्ट्या, नेव्ही ब्ल्यू रंगाची थ्री फोर्थ प्यांट, कमरेला पांढऱ्या रंगाचा टॉवेल बांधलेला, रंग काळा सावळा असून, उंची साडेचार फुटापर्यंत आहे. वरील वर्णनाच्या इसम व सदरच्या घटनेबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी ताबडतोब चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क (फोन – ०२१३५ – २४९३३३ ) साधण्याचे आवाहन चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी केले असून  याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

.