Pimpri News : जम्मू नगरपालिकेच्या शिष्टमंडळाला शहराच्या विकासाची भूरळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अल्पावधीत आणि झपाट्याने झालेला विकास प्रेरणादायी  असून पालिकेचे प्रकल्प, कामकाज यांचा अभ्यास करुन आमच्या नगरपालिकेत त्या आधारे सुधारणा करता येईल, असे मत जम्मू नगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती नरेंदरसिह जमवाल यांनी व्यक्त केले.

जम्मू नगरपालिकेच्या शिष्टमंडळाने  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह मोशी कचरा डेपो आदी प्रकल्पांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिष्टमंडळाचे स्वागत महापौर उषा ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.  यावेळी पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

या शिष्टमंडळात जम्मू नगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुधीर बाली, आरोग्याधिकारी डॉ. संयोगिता सुदन, कार्यकारी अभियंता निरज वैद, विक्रांत गुप्ता यांचा समावेश होता. मोशी येथील कचरा डेपोला शिष्टमंडळाने भेट दिली आणि तेथील घनकचरा व्यवस्थापन पध्दतीचा आढावा घेतला.  तेथील व्यवस्थापक अनिकेत जाधव यांनी कचरा व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती दिली.

81 एकर जागेमध्ये कचरा डेपोत विस्तारला असून डेपोत रोज 1 हजार मेट्रीक टन इतका कचरा जमा करण्याच येतो या कच-यावर प्रक्रिया करण्यात येते.  कचरा डेपो येथील जागेत प्लॅस्टीक पासून 5 टीपीडी क्षमतेचा इंधन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहे. तसेच तेथे  टाकावू कच-यापासून विद्युत निर्मिती प्रकल्पाचे काम सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर 14 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे.  सदरचा प्रकल्प पाहणी केल्यानंतर जम्मू नगरपालिकेच्या शिष्ट मंडळाने समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.