IPL 2021 : बातमी आयपीएलची- दिल्ली कॅपिटल्सने केली बलाढ्य कोलकाता संघावर सात गडी राखून दणदणीत मात

पृथ्वी शॉ ठरला शिल्पकार, केले या मोसमातले सर्वात वेगवान अर्धशतक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : आजच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीच्या रिषभ पंतने नाणेफेक जिंकून कोलकाता संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. शुभमन गील आणि नितीश राणाने सलामीला 25 च धावा जोडल्या असतना नितीश राणा अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पंतद्वारे यष्टीचीत झाला.

यानंतर राहुल त्रिपाठीच्या साथीने शुभमन गीलने 44 धावा जोडल्या, पण त्रिपाठी, सुनील नारायण आणि आयन मॉर्गन स्वस्तात बाद झाल्याने कोलकाता संघाची अवस्था पाच गडी बाद 82 अशी बिकट झाली. मात्र आंद्रे रसेल आणि शुभमन गीलने बऱ्यापैकी तग धरत रसेलच्या 27 चेंडूतल्या नाबाद 45 धावांमुळे निर्धारित 20 षटकात संघाला किमान दिडशेच्या आसपास धावसंख्या गाठून दिली. आणि रसेलने शेवटच्या षटकात केलेल्या आक्रमणामुळे 154 धावा कोलकाता संघाच्या नावावर लागल्या.

दिल्ली संघाकडून अक्षर पटेल आणि ललीत यादव यांनी प्रत्येकी दोन दोन बळी मिळवून कोलकाता संघाला चांगलेच जखडून ठेवले.

155 धावांचे लक्ष घेऊन उतरलेल्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने सुरुवात करताना पृथ्वी शॉ ने शिवम त्यागीच्या पहिल्याच षटकात लागोपाठ सहा चौकार मारत कोलकाता संघाच्या गोलंदाजावर जबरदस्त हल्ला केला, पहिल्याच षटकात लागोपाठ सहा चौकार मारून पृथ्वी शॉ विक्रमाच्या पुस्तकातले एक सोनेरी पान झाला आहे. आज त्याचा इरादा काय होता कोणालाही कळत नव्हते, पण त्याने आज एकापेक्षा एक जबरदस्त फटके आपल्या पोतडीतुन काढून विकर्मी फलंदाजी केली.

केवळ अठरा चेंडूत त्याने अर्धशतक करत या मोसमातील सर्वात  वेगवान अर्धशतक नोंदवले. दुसऱ्या बाजूला धवन सुद्धा त्याला साजेशी साथ देत होता, दोघांनी 132 धावा सलामीला जोडल्यानंतर शिखर कमिन्सच्या गोलंदाजीवर 46 धावांवर पायचीत झाला. पण पृथ्वी शॉ मात्र दुसऱ्या बाजूने हल्लाबोल करत होताच. एका क्षणी तो आपलं शतक पूर्ण करेल असे वाटत असतानाच तो 82 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला आणि कोलकाता संघाच्या गोलंदाजानी सुस्कारा सोडला. पण तोपर्यंत दिल्ली संघ विजयाच्या अगदीच जवळ आला होता.

मार्केस स्टोयनिसने विजयाचि औपचारिकता पूर्ण केली खरी पण आजच्या या विजयाचा शिल्पकार निर्विवादपणे पृथ्वी शॉच होता. त्याची ही खेळी चिरकाल लक्षात राहील अशीच होती. या विजयाने दिल्ली संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल आणि यामुळे त्यांना अंकतालिकेत सुद्धा आतापर्यंतच्या पहिल्या चार संघातले स्थान मिळाले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.