Pimpri : पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये वैद्यकीय कक्ष सुरु करण्याची  विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी  

एमपीसी  न्यूज –   पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीमध्ये वैद्यकीय कक्ष सुरू करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की,  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी मिळून सुमारे २ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व नागरिकांचा कामानिमित्त मुख्यालयात राबता असतो. मुख्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा नागरिकांना दुर्दैवाने तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज पडल्यास मुख्यालयातच नव्हे तर मुख्यालयाच्या आसपास खाजगी अथवा सरकारी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. एखाद्या व्यक्तीला तातडीच्या वैद्यकीय सुविधेची गरज निर्माण झाल्यास त्याला संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात न्यावे लागते. त्यासाठी किमान अर्धा तास लागतो. तोपर्यंत एखाद्या कर्मचाऱ्याच्या किंवा नागरिकाच्या जीवावर बेतू शकते. यापूर्वीही असे अनेक प्रसंग घडले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संस्थेने काम करणाऱ्या मुख्यालयामध्ये प्रथमोपचारासाठी वैद्यकीय कक्ष असणे गरजेचे आहे.

त्यामुळेच मुख्यालयात येणारे नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून तातडीच्या वैद्यकीय सुविधा, रूग्णवाहिकेसह वैद्यकीय कक्ष मुख्यालयाच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू करण्यात यावा अशी मागणी दत्ता साने यांनी आयुक्तांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.