Pimpri : पॅनकार्ड’ गुंतवणूकदारांना नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांची मागणी 

एमपीसी न्यूज – पॅनकार्ड क्लब संस्थेने गुंतवणूक योजनेच्या नावाखाली सुमारे 50 लाख गोरगरिब गुंतवणूकदारांना कोटींना गंडवले आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील अनेक गोरगरिब नागरिकांनी पैसे गुंतविले होते. त्यांची मोठी फसवणूक झाली आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या गोरगरिब सर्व गुंतवणुकदारांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात गोरखे यांनी म्हटले आहे की, पॅनकार्ड क्लब संस्थेने गुंतवणूक योजनेच्या नावाखाली सुमारे 50 लाख गुंतवणूकदारांना तब्बल 7035 कोटींना गंडवले उसल्याचे उघडकीस आले आहे. गुंतवणुकीवर दुप्पटीने व तिप्पटीने पैसे देण्याचे आमिष दाखवून शेकडो ग्राहकांना पॅनकार्ड क्लबमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

पॅनारॉमिक ग्रुप ऑफ कंपनीज पॅनकार्ड क्लबचे महाराष्ट्रभर हॉटेले असून ही कंपनी विविध हॉटेलच्या व्यवसायामध्ये तसेच जागेमध्ये गुंतवणूक करते. तसेच त्यातून मिळणारा नफा आपल्या सभासदांना देते, असे सांगून पॅनकार्ड क्लबने सामूहिक गुंतवणूक योजना सुरू केल्या होत्या. या योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांना अपघाती विमा देतानाच त्यांची रक्कम दुपटीने व तिपटीने देण्याची योजनाही आणली होती. बँकांकडून मिळणा-या व्याजापेक्षा पॅनकार्ड क्लबकडून मिळणा-या मॅच्युरिटीची रक्कम अधिक असल्याचे आमिष दाखवले होते.

पीसीएल कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणारे बहुतांश गुंतवणूकदार हे मध्यम वर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामध्ये कामगारनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील कष्टक-यांनी देखील पै-पै जमा करुन गुंतविले होते. त्यांची पुंजी परत मिळणे गरजेचे आहे.  त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी विनंती गोरखे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.