Chinchwad : बोगद्यातील कर्मचा-यांना वॉकीटॉकीसारखी उपकरणे देण्याची प्रवासी संघाची मागणी

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेने बोगद्यात गस्त घालणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांना त्वरीत संपर्क साधण्यासाठी वॉकीटॉकी सारखी उपकरणे हातळण्यासाठी द्यावीत, अशी मागणी प्रवासी संघाने केली आहे. कर्तव्य दक्ष रेल्वे कामगारांचे चिंचवड प्रवासीसंघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

गुरूवारी सायंकाळी मुंबईहून सुटलेली मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस खंडाळा घाटात रात्री सव्वाआठच्या सुमारास आली असताना मंकीहील स्टेशन जवळ पावसामुळे दरड रेल्वे मार्गावर कोसळली. त्यावेळी रेल्वे मार्गावर गस्त घालणार्‍या दक्ष रेल्वे कर्मचार्‍याच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्याबद्दल चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, उपाध्यक्ष सुधीर साहनी, नारायण भोसले, इक्बाल सय्यद, निर्मला माने, अ‍ॅड. मनोहर सावंत, मुकेश चुडासमा, हार्दिक जानी, तात्या मंजुगडे, शरद चव्हाण, सुरज आसदकर आदींनी प्रसंगवधान राखून हजारो प्रवासीयांचे जीव वाचविणार्‍या मध्य रेल्वेचे गस्त घालणार्‍या कर्मचार्‍यांचे अभिनंदनाचा ठराव केला.

कर्जत-लोणावळा दरम्यान गाडीला 30 ते 35 मिनिटांचा प्रवास करावा लागतो. खंडाळा घाटात घनदाट झाडी, जंगली जनावरे देखील असण्याची शक्यता आहे. सुमारे 26 लहान मोठे बोगदे आहे. जोखीम पत्करून कर्मचारी आपले काम दररोज रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिलेली रेल्वे मार्गाची जबाबदारी पार पाडतात. रेल्वे रुळावर बसविलेल्या चाव्या निखळलेल्या असतील तर, हातोड्याने ठोकून पूर्ववत करतात. पावसाळ्यात रेल्वे विभागाने सर्व दरडींची योग्य पाहणी करणे अपेक्षित आहे. धोकादायक दरडी हटविली जावी. गस्त घालणार्‍या कर्मचार्‍याकडे वॉकी टॉकी सारखी अत्याधुनिक उपकरणे द्यावीत. जेणेकरून संबंधित अधिकार्‍यांना घाटातील माहिती त्वरीत देता येईल. कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी व त्यांच्या सुरक्षिततेच्या उपाय योजना करण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे.

मध्य रेल्वेच्या या घाटातून दररोज दीडशेहून अधिक मेल, एक्सप्रेस गाड्या धावत असतात. त्यात हजारो प्रवासी प्रवास करतात. यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी स्वतः लक्ष घालून खंडाळा घाटाप्रमाणेच पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील लोणंद ते जरंडेश्वर दरम्यानही दरडी आहे. पनवेल, रत्नागिरी, कोकण रेल्वे मार्गावर डोंगर, दर्‍या आहेत. तेथेही गस्त घालणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांची सुरक्षा व त्यांना अत्यावश्यक अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी व प्रवासीयांच्या सुरक्षेबाबत उचीत निर्णय घ्यावेत, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.