Nigdi News : तडीपार केलेला आरोपी शहरात दहशत पसरवताना आढळला

पोलिसांकडून त्याची थेट येरवड्यात रवानगी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी ओटास्किम येथे कोयत्याच्या धाकाने लोकांना धमकावताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करत त्याची थेट येरवडा कारागृहात रवानगी केली.

आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर (वय 21, रा. राहुलनगर, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 31 डिसेंबर 2020 रोजी एकाच वेळी शहरातील 24 सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यात निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा गुन्हेगारांचा समावेश होता. त्यात पोलिसांनी आरोपी आदर्श याला देखील तडीपार केले होते.

तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहराच्या हद्दीत आला. तसेच तो मंगळवारी (दि. 26) रात्री साडेसात वाजता त्याने कोयत्याच्या धाकाने अंकुश चौक, ओटास्किम येथे  टपरी धारक आणि येणा-या जाणा-या लोकांना धमकावून दहशत निर्माण केली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला कोयत्यासह अटक केली.

आरोपी आदर्श याच्यावर कारवाई करत त्याची थेट येरवडा कारागृहात रवानगी केली. पोलीस नाईक विलास केकाण तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.