The Disciple selected for Venice festival: चैतन्य ताम्हाणेच्या ‘द डिसायपल’ची व्हेनिस महोत्सवासाठी निवड

एमपीसी न्यूज – कोणत्याही कलाकृतीला रसिकांबरोबर तज्ज्ञांची दाद मिळाली की त्या कलाकृतीच्या निर्मात्याला समाधान वाटते. असं म्हटलं जातं की मराठी चित्रपट आशयाच्या दृष्टीने नेहमीच सरस असतात. चित्रपटसृष्टीची पायाभरणी मराठीतून झाली आहे. पहिले चित्रकर्ते दादासाहेब फाळके हे मराठीच होते.

अनेक मराठी चित्रपटांनी केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपला ठसा उमटवला आहे. अनेक मराठी चित्रपटांचा इतर भाषेत रिमेक होत असतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांपैकी महत्त्वाच्या व प्रतिष्ठित असलेला चित्रपट महोत्सव म्हणजे ‘व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.’ यंदा रंगणाऱ्या या चित्रपट महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ या चित्रपटाची निवड झाली असून सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे केवळ मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे, तर बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील चैतन्यवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चैतन्यचं अभिनंदन केलं आहे.

आशय आणि विषय या दोन्हीबाबतीत सरस असलेल्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाची या ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत जॅकलीनने चैतन्यचं अभिनंदन केलं आहे. चैतन्यचा पहिला चित्रपट असलेल्या कोर्टने देखील चांगले नाव कमावले होते. त्याचवेळी चैतन्यच्या कामाची झलक रसिकांना दिसली होती.

व्हेनिस शहरात भरणाऱ्या या महोत्सवात इ.स. १९३७ साली या चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम’ हा भारतीय चित्रपट जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.