Pune News : मुलाचा खून न करण्यासाठी मागितली डॉक्टर महिलेकडे खंडणी

0

एमपीसी न्यूज : पुण्याच्या मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खंडणी मागण्याचा एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने डॉक्टर मुलीला फोन करून तुमच्या नवऱ्याने तुमची व मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याचे सांगत मुलाला न मारण्यासाठी 5 लाख रुपये खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकरण पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनी यातील आरोपीला ताब्यात घेतले आणि खरा प्रकार उघडकीस आला. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात एका 32 वर्षे डॉक्टर महिने तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या डॉक्टर असून, त्यांचा बिबवेवाडी परिसरात दवाखाना आहे. तर त्यांच्या पतीचे मार्केटयार्ड येथे दुकान आहे. त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी फिर्यादी यांच्या मोबाइलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला.

तसेच त्यांने फिर्यादी यांचे नाव घेऊन त्यांना मला तुमच्या पतीने 5 लाख रुपयांची सुपारी दिली असून, त्यात तुम्हाला अन मुलाला मारण्यास सांगितले आहे, असे सांगितले. पण मी लहान मुलांना मारण्याची सुपारी घेत नाही, त्यामुळे तुम्ही मला 5 लाख रुपये द्या असे म्हणत खंडणीची मागणी केली.

 या प्रकारामुळे फिर्यादी यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने घर गाठले आणि त्यांच्या पतीला व नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. फिर्यादी व त्यांच्या पतीने मार्केटयार्ड पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. वरिष्ठ निरीक्षक दुर्योधन पवार व उपनिरीक्षक शिंदे यांनी तात्काळ त्या व्यक्तीचा शोध सुरू केला.

काही तासांत पोलीसानी या आरोपीला पकडले. यावेळी तो एका बांधकाम इमारतीत मजुरी करत असल्याचे समजले. त्याने हा फोन का केला हे मात्र अजुन समजलेले नाही. तो मूळचा हरियाणा येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.