Pimpri : नि:स्वार्थ रुग्णसेवेचे कौतुक करणे हे कर्तव्य – नितीन यादव   

एमपीसी न्यूज – “रुग्णालयातील एखाद्या डॉक्टर, कर्मचाऱ्याच्या गलथानपणामुळे संपूर्ण रुग्णालय व्यवस्थापनाला दोषी धरले जाते; परंतु त्याचवेळी त्यांनी मानवतेच्या भावनेतून केलेल्या नि:स्वार्थ रुग्णसेवेचे कौतुक करणे हे देखील नागरिकांचे कर्तव्य आहे!” अशा भावना महाराष्ट्र राज्य जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष नितीन यादव पिंपरी येथे व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वाय सी एम) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचा सन्मान करताना पिंपरीतील वायसीएम रुग्णालय येथे  व्यक्त केल्या. नुकतीच काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पल्लवी गंगावणे या चोवीस वर्षीय महिलेचा पोटातून दुर्मिळ शस्त्रक्रिया करून सुमारे बारा किलो मांसाचा गोळा काढून तिला जीवदान देण्यात आले. त्यामुळे त्या महिलेला गर्भधारणा राहणे सोपे झाले असून ही तिच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाची बाब आहे. याचप्रमाणे एका तीस वर्षीय महिलेच्या मेंदूतील गाठ दुर्बिणीद्वारे काढून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यात त्या महिलेला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका होता म्हणून धाडसी निर्णय घेत भूल न देता तिच्याशी संवाद साधत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

तसेच एका चाळीस वर्षीय सुरक्षारक्षकाच्या कवटी आणि मणक्यांच्या रचनेत बिघाड असल्याने त्याच्या कवटीतील हाडे स्क्रूने जोडून सुमारे दोन तासांच्या अवघड शस्त्रक्रियेनंतर त्याला आरोग्य प्रदान करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या तीनही शस्त्रक्रियांसाठी खाजगी रुग्णालयात दोन लाखांपासून ते दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असताना वायसीएम रुग्णालयात मोफत किंवा अगदी नगण्य खर्चात या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या.

या प्रकरणांची दखल घेत एरव्ही रुग्णालयातील रुग्णसेवेतील अनागोंदी आणि गलथान कारभाराबद्दल दोषारोप करीत त्यांना धारेवर धरणाऱ्या महाराष्ट्र राज्य जागृत नागरिक महासंघाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ राजेंद्र वाबळे यांच्या मुख्य उपस्थितीत डॉ. संजय पाडळे, डॉ. अमित वाघ, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. कांचन वायकुळे, डॉ. जितेंद्र वाघमारे, डॉ. हर्षद चिपडे, डॉ. प्रवीण सोनी, डॉ. मारुती गायकवाड, डॉ. हर्षद गावडे, डॉ. अपूर्वा झरकर, डॉ. नीलम इंगळे, डॉ. अभिजित श्रीवास्तव, ज्ञानेश पाटील, सुजाता ताथे, स्मिता शेटे, मोनिका चव्हाण, युनूस पगडीवाले यांची मुक्तकंठाने प्रशंसा करीत त्यांना सन्मानित केले.

यावेळी “जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना देव मानण्यापेक्षाही त्यांचा माणूस म्हणून विचार करावा; आणि माणूस चुकू शकतो ही उदात्त भावना ठेवावी. अंतिमतः सर्व नागरिकांना चांगली रुग्णसेवा मिळावी. हाच जागृत नागरिक महासंघाचा उद्देश आहे!” अशी भूमिका नितीन यादव यांनी आपल्या मनोगतातून मांडली. सत्काराला उत्तर देताना डॉ. राजेंद्र वाबळे यांनी कृतज्ञता व्यक्त करून अशा प्रकारे डॉक्टरांचे मनोबल वाढवण्याचे कार्यक्रम वारंवार होतील, अशी दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी रुग्णालय सदैव कटिबध्द राहील, अशी ग्वाही दिली.

जागृत नागरिक महासंघाच्या प्रकाश पाटील, अशोक कोकणे, राजेश विश्वकर्मा, श्रीनिवास कुलकर्णी, उमेश सणस, राजू डोगीवाल, राजेंद्र कदम, सतीश जाधव, संभाजी मोरे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. उमेश सणस यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like