Sangvi : विद्यार्थ्यांनी बनविले इकोफ्रेंडली आकाशकंदील

अरविंद एज्युकेशन सोसायटीत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी

एमपीसी न्यूज –  विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच इतर उपक्रमाची आवड निर्माण व्हावी, कौशल्य आत्मसात व्हावे, तसेच दिवाळीत आकाशकंदीलाचे काय महत्त्व आहे हे समजावे, या उद्देशाने जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मिडियम स्कूलमध्ये दिपावली निमित्त इकोफ्रेंडली आकाशकंदील, रांगोळी, पणत्या, डेकोरेशन बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. आजकाल महागाईच्या जमान्यात चायनामेड आकाशकंदीलाच्या झगमगाटाला छेद देणार्‍या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारचे इकोफ्रेंडली आकाशकंदील बनविले.

कार्यशाळेत मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी पर्यावरणाला घातक असे फटाके दिवाळीत फोडू नका. फटाक्यांसाठी कमी खर्च करून ध्वनिप्रदूषण टाळावे व दिवाळीत फराळाचा आस्वाद घेत दिवाळी साजरी करा. पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. रिंकू शिंगवी, प्रिया मेनन यांनी बाजारात मिळणारे प्लास्टिकचे आकाशकंदील न वापरता प्रत्येकाने कागदापासून बनविलेले कंदील वापरल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याविषयी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

दीपावली सणाचे महत्त्व लक्षात घेता आकाशकंदीलाची पर्यावरणाशी सांगड घालण्याचा प्रयत्न या कार्यशाळेद्वारे करण्यात आला. तयार करण्यात आलेले आकाशकंदील न्याहाळताना विद्यार्थी हरखून गेले होते. आपण इतके सुंदर आकाशकंदील बनवू शकतो, याचा आत्मविश्‍वास विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. शाळेत रांगोळी काढून पणत्यांची आरास करण्यात आली होती. शाळेची सजावटही विद्यार्थ्यांनी केली. तसेच विविध रंगातल्या, विविध आकाराच्या पणत्याही विद्यार्थ्यांनी बनविल्या. स्वत: डेकोरेशन तयार करून विद्यार्थ्यांनी वर्ग सुशोभित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.