Pimpri News: शहरात पदवीधर निवडणुकीचे वातावरण तापले!

मतांच्या बेगमीसाठी पवार, पाटलांची धावपळ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतांच्या बेगमीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची धावपळ सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने विजयासाठी जोर लावला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडवर लक्ष केंद्रित केले आहे. या दोनही शहरात राष्ट्रवादी, भाजप पदाधिका-यांच्या जोर, बैठका चालू आहेत. यामुळे ऐन थंडीत शहरातील वातावरण तप्त झाले आहे.

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्या मुख्य लढत होत आहे. 1 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाला आठ दिवस राहिल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ वर्षानुवर्षे भाजपच्या ताब्यात राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर, भाजपकडून मतदारसंघ खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीनेही जोर लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रामुख्याने पुणे, पिंपरी-चिंचवडवर लक्ष केंद्रित केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधरसाठी 31 हजार 991 मते आहेत. या मतांच्या बेगमीसाठी दोन दिवसांपूर्वी चंद्रकात पाटील यांनी शहराचा दौरा केला. शैक्षणिक संस्था, बँकाना भेटी दिल्या. दिवसभर बैठका घेतल्या. राज्यातील करंट्या सरकारमुळेच पदवीधरांचे नुकसान झाल्याचा आरोप सरकारवर केला.

राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीकडून लढत असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांच्यासाठी रविवारी (दि.22) मेळावा घेतला. पुणे पदवीधरचे दहा वर्ष नेतृत्व करणारे निष्क्रिय ठरले आहेत. त्यांनी या वर्गासाठी काहीच काम केले नाही अशी टीका पदवीधरचे नेतृत्व केलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. पुणे पदवीधर मतदारसंघ पवारांवर प्रेम करणारा मतदार संघ आहे. कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागावे. लाड यांना मोठ्या फरकाने निवडून आणावे असे आवाहन केले.

शहरात काँग्रेस, शिवसेना प्रचारापासून अलिप्त!
राज्यातील सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सहभागी आहे. अरुण लाड महाविकास आघाडीचे पुणे पदवीधरचे अधिकृत उमेदवार आहेत. पिंपरी-चिंचडमधील प्रचारात राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिसतात. पण, काँग्रेस, शिवसेनेचा एकही पदाधिकारी प्रचार करताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतील मेळाव्यालाही काँग्रेस, शिवसेनेचा एकही पदाधिकारी हजर नव्हता.

त्यामुळे पदवीधरच्या प्रचारात महाविकास आघाडीतील पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस आणि शिवसेना पदाधिका-यांनी अलिप्त राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या मेळाव्याचे निमंत्रण नव्हते, असे शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.