Pimpri : आयुक्त सत्ताधा-यांना ‘इलेक्शन’ फंड गोळा करुन देत आहेत – राहुल कलाटे 

वाकड परिसरात पाणी टंचाई असतानाही 'एनओसी' देण्यास सुरुवात का केली? 

एमपीसी न्यूज – वाकड परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्यामध्ये कोणत्याही सुधारणा केल्या जात नाहीत. असे असताना महापालिकेने अचानक नवीन बांधकामांना पाणीपुरवठ्याची ना हारकत (एनओसी)देण्यास सुरुवात केली. पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नसताना एनओसी देण्यास का सुरुवात केली? तसेच परवानगी  का बंद केली होती? याचे उत्तर प्रशासनाला देता येत नसून महापालिका आयुक्त ‘एनओसी’ देण्याचे चालू बंद करुन सत्ताधा-यांना ‘इलेक्शन’ फंड जमा करुन देत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केला. तसेच आयुक्त कोणाच्या सांगण्यावरुन  असे निर्णय घेत आहेत, असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिंचवड मतदार संघात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर असल्याचे कारण देत पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे इत्यादी भागात तात्पुरत्या स्वरुपात गृहप्रकल्प बांधण्यास परवानगी देण्यात येऊ नये असे निर्णय स्थायी समितीत सदस्यप्रस्ताव्दारे घेतला होता. तथापि, प्रशासनाने या निर्णयाची अमंलबजावणी केली नव्हती. केवळ वाकड परिसरातील नवीन बांधकामांना पाणीपुरवठ्याची ‘एनओसी’ देणे बंद केले होते. अचानक प्रशासनाने गुरुवार (दि.4)एनओसी देण्यास सुरुवात केली. दहा व्यावसायिक बांधकांना गुरुवारी एनओसी देण्यात आल्या. प्रशासनाच्या या दुट्‌पी भूमिकेवर कलाटे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेऊन हल्ला चढविला.

कलाटे म्हणाले, महापालिकेने 27 जून 2018 रोजी वाकड, ताथवडे, रहाटणी, काळेवाडी, पिंपळेनिलख परिसरात नवीन व्यावसायिक बांधकामांना पाणीपुरवठ्याची ‘एनओसी’ देण्याचे बंद केले. एनओसी देण्याचे का बंद केले याची 4 जुलै रोजी प्रशासनानकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. तथापि, स्मरणपत्र देऊनही प्रशासनाने पत्राला कोणतेही उत्तर दिले नाही, असे असताना अचानक गुरुवारी (दि.4)  पाणीपुरवठ्याची एनओसी देण्यास सुरुवात करण्यात आली.

एकाच दिवशी दहा व्यावसायिकाला एनओसी देण्यात आल्या. एनओसी देण्याचे का चालू केले? का बंद केले होते? याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेविशयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. आयुक्त कोणाच्या सांगण्यावरुन असे निर्णय घेत आहेत. त्यांना कोण ऑपरेट करत आहे, असेही ते म्हणाले. तसेच वाकड येथे नवीन टाक्याचे भूमिपूजन करण्यासाठी महापौरांना 1 सप्टेंबर रोजी पत्र दिले आहे. एक महिना गेला तरी ते भूमिपूजनसाठी वेळ देत नाहीत, असा आरोपही कलाटे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.