Successful fight against Corona: ‘तत्काळ निदान, त्वरीत उपचार अन् पालिका यंत्रणेच्या सहकार्यामुळेच मी कोरोनाला हरविले!’

'एमपीसी न्यूज'चे मुख्य वार्ताहर गणेश यादव यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु, प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मकतेमुळे त्यांनी कोरोनावर लवकर मात केली. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यापासून ते कोरोना मुक्त होईपर्यंतचा अनुभव गणेश यादव यांनी शब्दबद्ध केला आहे.

एमपीसी न्यूज (गणेश यादव)- पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून आज किती रुग्ण, कुठले, वय किती आणि कोण पॉझिटिव्ह आहेत. याच्या बातम्या देण्यास सुरुवात झाली. काही महिने तर फक्त कोरोनाच्या बातम्या सुरू होत्या. कधीतरी वेगळा विषय मिळायचा. स्पर्धेचे जग असल्याने सर्वांत अगोदर ‘एमपीसी न्यूज’च्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहविण्याचा प्रयत्न असतो. नंतर बातम्याचे स्वरूप बदलत गेले. युवक, वयोवृद्ध रुग्ण, प्रभागनिहाय रुग्ण, कंटेन्मेंट झोन, लॉकडाऊनची नियमावली, किती रुग्ण बरे झाले, सक्रिय किती आहेत. याच्या बातम्या सुरू झाल्या. पालिकेची तयारी, कोविड केअर सेंटरच्या बातम्या, आयुक्तांशी बोलून तयारीच्या बातम्या, रुग्ण किती होतील, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी किती दिवसांचा आहे. याच्या बातम्या सुरू होत्या.

तिसऱ्या टप्प्यात मृत्यूच्या बातम्या वाढल्या होत्या. वयोवृद्ध आणि लहान मुलांचा मृत्यू होत असल्याचे अगोदर सांगितले जात होते. पण, मृतांमध्ये 20, 28, 35 वयवर्षे असलेल्या रुग्णांचाही समावेश होऊ लागला. मृत्यूंमध्ये वाढ होऊ लागल्याने कशामुळे वाढ होत आहे. त्याच्या बातम्या सुरू झाल्या.

आजार लपवणे, अंगावर काढणे, उशिरा रुग्णालयात दाखल होणे, पूर्वीचे आजार अशा रुग्णांचाच मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे डॉक्टर सांगत होते. काही दिवस घरून तर नंतर ऑफिसमध्ये येऊन काम सुरू होते. बाहेर जाणे होतेच…कोण नेता आला की तिकडे तर हमखास जाणे होते.

वायसीएमएच, कोविड सेंटर, पालिकेत जाणे झाले होते. आपण खूप काळजी घेत आहोत. त्यामुळे आपल्याला कोरोना होणार नाही. असे ठामपणे वाटत होते. बाहेर फिरत असल्याने एकवेळा केलेली चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे आणखी रिलॅक्स होतो. पण, दुसऱ्यावेळी लक्षणे दिसत होती. आता लक्षणे दिसत असताना आपण दुर्लक्ष करून चालणार नाही असा विचार केला आणि चाचणी केली. तर पॉझिटिव्ह आली. पाच महिने मला काही होत नाही म्हणणारा मी पॉझिटिव्ह आल्यावर मात्र शांतच झालो होतो.

26 ऑगस्टची सकाळ उजाडली. सर्व आटोपून ऑफिसला जाण्याची तयारी करत होते. हृषिकेश तपशाळकर सरांना फोन करून सर 11 च्या दरम्यान ऑफिसला जाऊ म्हटलो. मी एक बातमी दिली आणि थोडं झोपलो.

पण, झोप लागेना.. 11च्या सुमारास ऑफिसला जाण्यासाठी बॅग उचलली. तेवढ्यात अशक्तपणा जाणवला. तत्काळ पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय सरांना फोन लावला. त्यांनी वेळ न दडवता तपासणी करून घे. निगडीतील यमुनानगर रुग्णालयात जा, मी तेथील डॉक्टरंना बोलतो असे सांगितले.

ऑफिसमधील सहकारी बंधू प्रमोद यादवला फोन केला. आपण दोघे सोबत असतो, मला कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. तू पण ये आपली तपासणी करून घेऊ. तो आल्यानंतर रुग्णालयात गेलो. दरम्यानच्या काळात अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी पण डॉक्टरंना सांगून ठेवले होते.

रुग्णालयात मी पोहोचलो असता भोईर मॅडमनी त्वरित अर्ज भरून घेतला. डॉ. बच्छाव सरांनी अगोदर अँटीजेन तपासणी केली. प्रमोदची पण केली. त्यांनतर माझी ‘आरटीपीसीआर’ चाचणीपण केली. भोईर मॅडमनी विचारले दोन्ही चाचण्या करायला कोणी सांगितले. डॉ. रॉय सरांनी सांगितले असल्याचे म्हणताच त्यांनी सरांशी संपर्क साधला.

पाच मिनिटांनी त्या बाहेर आल्या आणि तुम्ही पॉझिटिव्ह असल्याचे मला सांगितले. पॉझिटिव्ह कळताच मला धक्काच बसला. मला कशी आणि कोणाच्या संपर्कातून लागण झाली असे विविध प्रश्न मनात येऊ लागले. मागील सहा महिन्यांपासून कोरोनाच्या बातम्या देत असल्याने जास्त भीती वाटत नव्हती. पण, पॉझिटिव्ह आल्याक्षणी धोडा धक्का बसला होता.

भोईर मॅडमनी काही होत नाही. तुम्ही लवकर बरे व्हाल असे सांगत धीर दिला. त्यामुळे थोडीशी निर्माण झालेली भीती, ताण कमी झाला. डॉ. रॉय सरांनी जिजामाता रुग्णालयात जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरातील सदस्यांची तपासणी करून घ्या असे सुचविले.

भावाला, वहिनीला बोलावून घेतले. माझ्यापेक्षा भाऊच खूप घाबरल्याचे दिसत होते. त्याने माझी बॅग भरून दिली आणि तो तपासणीसाठी गेला. त्याचदरम्यान कोरोनाच्या दाढेतून बाहेर आलेले पालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांचाही फोन झाला. घाबरू नको, काही होत नाही. रुग्णालयात दाखल हो मी सोबत आहे असा दिलासा दिला. तपशाळकर सर, अनिल कातळे सरांचे पण बोलणे झाले.

माझ्यासोबतच चाचणी केलेला आणि निगेटिव्ह आलेला मित्र प्रमोद यादव सोबत होता. मी पॉझिटिव्ह असल्याचे माहिती असूनही तो दुचाकीवर मला सोडवायला आला. त्याच्या धाडसाला सलाम. जिजामाता रुग्णालयाचे प्रमुख डॉ. होडगर सरांनी विश्वास वाढविला. तुम्ही पत्रकार असून शांत आहात. त्यामुळे लवकरच बरे व्हाल, कारण शांत माणसे लवकर बरे होतात असे त्यांनी सांगितले होते. (खरे तर पॉझिटिव्ह आल्यामुळेच मी शांत झालो होतो) त्यांनी रुग्णालयात दाखल करून घेत दुसऱ्या मजल्यावरील वार्डमध्ये पाठवले.

मित्र प्रमोदची धावपळ सुरूच होती. त्याने बाहेरील मेडिकल मधून औषधे आणून दिली आणि रुग्णालयातील प्रवास सुरु झाला. दाखल होताच मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार विनोद पवारसरांचा फोन आला. काय होत नाही. सर्वांनाच होत आहे. काळजी करू नको, काळजी घे असा सल्ला दिला. ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाच भावाची आणि वहिणीची अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आल्याचा दिलासादायक बातमी समजली. या सर्व प्रक्रियेत पालिकेच्या यंत्रणेने महत्वपूर्ण सहकार्य केले.

मोठा भाऊ डॉ. किशोर यादव याचा फोन आला. त्याने औषधे घेण्याबाबत सूचना दिल्या. बहीण अ‍ॅड. पल्लवीने फोन करत धीर दिला. दाखल झाला का हे विचारण्यासाठी तपशाळर सरांचा पुन्हा फोन झाला. कातळे सरांनी देखील काही अडचण आली तर फोन कर, असे सांगितले. वार्डमध्ये गेल्यावर पॉझिटिव्ह रुग्ण आणि कोणीच ओळखीचे दिसत नसल्याने जरा भीतीच वाटायला लागली.

तेवढ्यात पालिकेचे कर्मचारी विजय भैलुमे सरांनी आवाज दिला आणि कोणीतरी ओळखीचे निघाल्याने हायसं वाटले. भैलुमे सरांनी रुग्णालयातील सगळी प्रक्रिया समजून सांगितली.

डॉक्टरांनी जेवण केल्यानंतर ‘फॅबीफ्लु’ नावाच्या नऊ गोळ्या एकाचवेळी खाण्यास सांगितल्या. सायंकाळी डॉ. गोफणे, विनोद सरांनी पुन्हा विचारपूस करत धीर दिला. संध्याकाळी एक्सरे काढला. रात्रीचे जेवण सुरू असताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर सर यांनी फोन करून विचारपूस केली. काळजी घेण्याची सूचना केली.

कोरोनाला हरवून आलेले शिवसेना गटनेते राहुलदादा कलाटे यांचाही फोन आला. त्यांनीही धीर दिला. नाईट ड्युटीला आलेले डॉ. प्रफुल्ल तपशाळकर सर भेटले. माझ्या बेडशेजारील राजू कदम, माजी नगरसेवक संतोष कुदळे यांच्याशी गट्टी जमली. रात्री गप्पा मारल्या. कोरोना झाल्याचे मी विसरून जात होतो. पण, रात्री गोळ्या खाताना आणि झोपल्यावर हा कोरोना पुन्हा आठवण करून देत होता.

कुठून लागण झाली असेल असा प्रश्न पडत होता. आता त्यावर विचार करण्याची वेळ निघून गेली आहे. असे म्हणाला सांगत विसरून जाण्याचा प्रयत्न करत होतो. संपादक विवेक इनामदार सरांचा फोन आली. काळजी घे, आराम कर, अनुभव घे, कोरोनातून बरे झालेल्यांच्या अनेक बातम्या तू दिल्या आहेस. त्यामुळे घाबरू नको, लवकरच बरा होशील, सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला.

दररोज सकाळी लवकर उठणे, व्यायाम, सकाळी आठ वाजता नाष्टा, त्यानंतर आराम, दुपारी साडेबारा वाजता जेवण पुन्हा आराम आणि रात्री साडे आठ वाजता जेवण करून पुन्हा आराम असा पहिले पाच दिवस दिनक्रम होता. पहिले काही दिवस खूप आरामाची आवश्यकता भासते. या दरम्यान पालिका यंत्रणेने मोलाचे सहकार्य केले.

कोरोना आजार एवढा मोठा नाही. जेवढा त्याचा बाऊ केला जातो. वेळीच चाचणी आणि उपचार केल्यास काहीच होत नाही. तुम्हाला पूर्वीचे कोणते आजार नसल्यास सलाईनची देखील आवश्यकता भासत नाही. टॅबलेटवरच तुम्ही बरे होऊ शकता.

फक्त पहिले चार-पाच दिवसच त्रास होतो. त्यांनतर तुम्हाला कोणताही त्रास जाणवत नाही. पण, चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून तुम्हाला 17 दिवस आयसोलेट रहाणे बंधनकारक आहे. त्यांनतर विलगीकरणात राहावे लागते. सकारात्मक विचार, नियमित व्यायाम आणि काळजी घेतल्यावर कोरोनात कोणताही त्रास जाणवत नाही. हा माझा अनुभव आहे.

पॉझिटिव्ह रुग्ण एकमेकांना खूप धीर देतात!

माझ्या वार्डमध्ये सहा रुग्ण होते. सगळ्यांचे सात ते आठ दिवस पूर्ण झाले होते. सगळे एकमेकाला धीर देत आणि मदत करत असत. कोणालाच एकटेपणा जाणवू देत नव्हते. भारतीय बैठक मांडून जवळजवळ जेवणास बसत होतो. आमचा एकदम चांगला ग्रुप झाला होता.

सगळेच पॉझिटिव्ह असल्याने कोणालाच कोणाची भीती वाटत नव्हती. पण, प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णाला मात्र आमच्या वार्डात ठेवू नका, आता कुठे बरे वाटत आहे, असे सांगत भीतीपोटी विरोध करत होते.

रुग्णालयातील कोरोना योद्धे डॉक्टर, नर्सला सलाम!

पॉझिटिव्ह आल्यानंतर रक्ताच्या नात्यापासून सर्वजण अंतर बाळगून राहतात. संसर्ग होऊ नये यासाठी राहणे गरजेचे आहेच. आपल्या जीवाची पर्वा न करता योद्धे डॉक्टर, नर्स काम करत आहेत. इंजेक्शन देणे, ऑक्सिजन पातळी, बीपीची तपासणी करताना रुग्णांशी त्यांचा स्पर्श होतोच. त्यांनी सुरक्षिततेसाठी पीपीई किट घातली असली तरी त्यांनाही आपल्या जीवाची भीती वाटतेच..तरीही ते या महामारीत काम करत आहेत. म्हणूनच त्यांना कोरोना योद्धाची उपमा दिली जात आहे.

अतिशय आपुलकीने डॉक्टर, नर्स रुग्णांची विचारपूस करत धीर देत होते. डॉ. होडगर सर, डॉ. अल्लवी सर, डॉ. तेजश्री घोडे, डॉ. करुणा हरले, नर्स, आरोग्य सेवक, सेविका या सर्वाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाच्या नानाविध तक्रारी असत. नवीन बेडशीट द्या, हे द्या, ते द्या अशा मागण्या सुरूच असत. पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करणारे आरोग्य सेवक कोणतीही चिडचिड न करता स्मितहास्य करत प्रत्येक गोष्ट आणून देत होते.

वर्क फ्रॉम हॉस्पिटल!

बुधवारी कोरोनाची लागण झाल्यानंतर पहिले चार दिवस औषधांचा मारा जास्त होता आणि त्रास देखील होत होता. त्यांनतर प्रकृतीत सुधारणा झाली. मग बसून काय करायचे असा विचार आल्याने पाचव्या दिवशी काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोमवार (दि.31) पासून वर्क फ्रॉम हॉस्पिटल सुरू केले.

दररोज बातम्या देण्यास सुरुवात केली. कामामध्ये दिवस कसा संपला हे लक्षातही येत नसे. पुढील सहा दिवस कसे संपले हे कळलेच नाही. काल रविवारी मला डिस्चार्ज मिळाला आहे. आता 15 दिवस मला विलगीकरणात रहावे लागणार आहे.

महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनीही विचारपूस केली. डॉ. गोफणे सर पूर्णपणे लक्ष ठेवून होते. वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी खूप सहकार्य केले. या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!!

पत्रकार बांधवांचे आभार!!

पत्रकार बांधवांनी फोन करून विचारपूस केली. दिलासा दिला. जेष्ठ पत्रकार विजय भोसले, गोविंद घोळवे, नंदकुमार सातुर्डेकर, स्वप्नील पोरे, विनोद पवार, हनुमंत पाटील, डॉ. विश्वास मोरे, विवेक गाडे, बापूसाहेब गोरे, विश्वास रिसबूड, तुषार रंधवे, अश्विनी भोगाडे मॅडम, मंगेश हाडके, मंगेश पांडे, संदेश पुजारी, चैतन्य मचाले, राजा गायकवाड, अमोल काकडे,  मनोज मोरे, सुहास मातोंडकर, प्रकाश गायकर, तेजस टवलारकर, मिलिंद कांबळे, बाबू कांबळे, जॉर्ज अडसूळ, विष्णू सानप, मोहन दुबे, पंकज खोले, गौरव चौधरी, लीना माने, आशा साळवी मॅडम, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, पालिकेचे कर्मचारी संजय राऊत, प्रफुल्ल पुराणिक, कुशल पुरंदरे, कर्मचारी महासंघाच्या सरचिटणीस सुप्रिया ताई सुरगुडे, उदय औटी, ऑफिस मधील सहकारी स्मिता जोशी, दिग्विजय जिरगे, गोविंद बर्गे, श्रीपाद शिंदे, प्रमोद यादव, समीर पाटील, प्रवीण टाव्हरे हे सातत्याने संपर्कात होते. या सर्वांचे मनापासून आभार !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.