Corona Death Compensation : मोठी बातमी ! कोरोना मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून मिळणार 50 हजारांची आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – मागील जवळपास दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या जीवघेण्या आजाराचा सामना सर्वजण करत आहेत. या संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. आता कोरोना मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने याबाबत जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे.

कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात निदान झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत दिली जाणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.